आमची शाखा कुठेही नाही, पुण्यातील शिवसैनिकांची अवस्था; सर्वच जागा भाजपाकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 04:34 PM2019-10-01T16:34:24+5:302019-10-01T16:35:42+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- शिवसेनेने पुण्यातील हडपसर आणि शिवाजीनगर हे दोन मतदारसंघ मागितले होते. मात्र भाजपाने ही मागणी फेटाळली
पुणे - विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा मित्रपक्षांची युती झाली असली तरी जागा वाटपाच्या घोळावरुन दोन्ही पक्षांचे अनेक कार्यकर्ते नाराज असल्याचं समोर येत आहे. पुणे सारख्या ठिकाणी युतीमध्ये शिवसेनेला एकही जागा दिली गेली नाही. त्यामुळे पुण्यातील शिवसैनिकांची अवस्था आमची शाखा कुठेही नाही अशी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. शहरातील 8 आमदार भाजपाचे आहेत तसेच पुण्याचा खासदारही भाजपाचाच आहे.
युती होण्याच्या पार्श्वभूमीवर अनेक शिवसैनिकांनी पुण्यातील किमान 2 जागा शिवसेनेला सोडाव्यात अशी जोरदार मागणी केली होती. मात्र युतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यात पुण्यातील सर्वच जागा 8 भाजपाला देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे नाराज शिवसैनिकांनी मातोश्री गाठली आहे. पुण्यात विद्यमान खासदार गिरीश बापट हे कसबा पेठ मतदारसंघातून आमदार होते. या जागेवर पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना संधी देण्यात आली आहे.
तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील कोथरूड मतदारसंघात तिकीट देण्यात आली आहे. या जागेवर विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांची तिकीट कापून कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील निवडणूक लढविणार आहेत. 2014 मध्ये शिवसेना-भाजपा या दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्यावेळी पुण्यातील सर्व 8 जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले होते.
शिवसेनेने पुण्यातील हडपसर आणि शिवाजीनगर हे दोन मतदारसंघ मागितले होते. मात्र भाजपाने ही मागणी फेटाळली. हडपसरमधून विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे तर शिवाजीनगरमधून विद्यमान आमदार विजय काळेंना डावलून माजी खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुणे महापालिकेत भाजपाचे 96 नगरसेवक निवडून आलेले आहेत. याठिकाणी शिवसेना-भाजपाची युती झाली तरी महापालिकेच्या सत्तेत शिवसेनेला वाटा देण्यात आला नाही. त्यामुळे सत्तेचे कोणतेही फायदे शिवसेनेला मिळत नाहीत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी गेली दोन-तीन वर्ष मतदारसंघ बांधणारे शिवसेनेचे इच्छुक नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे गरजेचे आहे.
भाजपाने विधानसभेसाठी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत 'या' आयारामांना संधी https://t.co/pRJ0aNFV6j#VidhanSabha2019#MaharashtraElections2019#महाराष्ट्रविधानसभानिवडणूक@BJP4Maharashtra
— Lokmat (@MiLOKMAT) October 1, 2019