Maharashtra Weather News : थंडीची लाट, यलो अलर्ट जारी ! उत्तर भारतात आणि महाराष्ट्रात वाढला थंडीचा कडाका
By श्रीकिशन काळे | Published: November 29, 2024 12:24 PM2024-11-29T12:24:26+5:302024-11-29T12:25:30+5:30
Maharashtra Weather News : पुणे, नाशिक, नगरला इशारा : तापमानाचा पारा आणखी घसरणार
पुणे : उत्तर भारतात आणि महाराष्ट्रात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. किमान आणि कमाल तापमानातही घट होत आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागात धुक्याचे प्रमाण वाढले आहे, तर गुरुवारी (दि. २८) मध्य प्रदेशातील मांडला येथे देशातील सर्वांत कमी ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नगरमध्ये सर्वांत कमी ९.५ किमान तापमान होते. राज्यात नाशिक, नगर आणि पुण्यामध्ये थंडीच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वादळी प्रणालीचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तर भारत आणि महाराष्ट्रात थंडीचा कडाका असाच कायम राहणार आहे. मध्य प्रदेशातील मांडला येथे गुरुवारी (दि. २८) ६.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली, तर धुळे आणि निफाड येथे ८ अंशावर तापमान होते. पुण्यातील ‘एनडीए’मध्ये ८.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे पुणेकरही चांगलेच गारठले आहेत. नाशिक, नगर आणि पुणे या भागात थंडीची लाट येणार असून, तिथे हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यभरात अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढला असून, गुरुवारी (दि. २८) धुळे येथील कृषी महाविद्यालय आणि निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नगर येथे ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यात आणखी घट होऊ शकते. राज्यातील तापमानातील घट कायम राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
राज्यातील किमान तापमान
पुणे : ९.८
नगर : ९.५
जळगाव : ११.२
कोल्हापूर : १५.१
महाबळेश्वर : ११.५
मुंबई : २२.२
नाशिक : १०.५
सातारा : १२.५
परभणी : ११.५
गोंदिया : ११.४
नागपूर : ११.८
राज्यभर थंडीचा कडाका !
राज्यातील बहुतांश शहरांचे किमान तापमान हे १० ते १४ अंश सेल्सिअसमध्ये नोंदवले जात आहे. काही ठिकाणी तर तापमानाचा पारा ८ अंशावर आला. त्यामध्ये पुण्यातील ‘एनडीए’चा समावेश आहे. महाबळेश्वरला सर्वांत अधिक थंडी पडते. पण, या वेळेस इतर ठिकाणी तिथल्यापेक्षाही कमी तापमानाची नोंद होत आहे.
उत्तर भारतातून येणारे थंड वारे, तसेच वायव्य आशियातून, आपल्याकडे आणि उत्तर भारतात नियमितपणे एकापाठोपाठ मार्गक्रमण करणारे पश्चिमी वाऱ्याचे प्रकोप होत आहेत. त्यामुळे थंडीचा कडाका जाणवत आहे. पुढील पाच दिवस ही थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच उलट किमान तापमानात आणखी घट होऊ शकते.
माणिकराव खुळे, सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ, पुणे