महाराष्ट्र तहात हरणार नाही; लोकसभेला पुण्यासह महाराष्ट्र जिंकू- संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 08:42 AM2024-02-27T08:42:52+5:302024-02-27T08:43:57+5:30
लोकसभेला पुणे जिल्ह्यातील चारही जागांसह महाराष्ट्र जिंकू, असा निर्धार शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला....
पिंपरी : महाराष्ट्र लढाईत जिंकतो; मात्र तहात हरतो, असा इतिहास सांगितला जातो; मात्र जो तहात जिंकला, तो दिल्लीश्वर औरंगजेबही महाराष्ट्राच्या मातीत गाडला गेला, हाही इतिहास आहे. आता महाराष्ट्र तहात हरणार नाही, तर जिंकायचा इतिहास परत घडवणार आहे. लोकसभेला पुणे जिल्ह्यातील चारही जागांसह महाराष्ट्र जिंकू, असा निर्धार शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला.
चिंचवड येथे सोमवारी दिवंगत माजी खासदार गजानन बाबर यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘संघर्षयात्री’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील व अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे व गौतम चाबुकस्वार, महादेव बाबर, अनिल बाबर, शिवसेना संघटक संजोग वाघेरे, प्रकाश बाबर, योगेश बाबर, भगवान वाल्हेकर आदी उपस्थित होते.
खा. राऊत म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी चाळीस आणि काँग्रेसचा एक असे ८१ आमदार त्यांनी फोडले असले, तरी आम्ही १८१ निवडून आणून इतिहास घडवू. जमलेले कार्यकर्ते म्हणजे विजयाची तुतारी आहे. गजानन बाबर यांनी संघर्षयात्रा सुरू केली, त्या यात्रेचे आपण सगळे पाईक आहोत. काल साताऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला तुतारी वाजवण्यात आल्या. आपला प्रचार विरोधकच करीत आहेत. येणाऱ्या निवडणुकीत तुतारी आणि मशाल इतिहास घडवणार आहे.
खासदार कोल्हे म्हणाले की, विकास म्हणजे मिळणारा निधी, अथवा मोठमोठ्या इमारती उभ्या करणे नसते, तर महाराष्ट्राचा स्वाभिमान झुकू न देणे हेही महत्वाचे असते. माजी आमदार लांडे म्हणाले की, काहीजण तुरूंगात जाण्यासाठी भितात, पण खासदार संजय राऊत तुरूंगात जाऊन आले तरीही ‘फुल नडतात’. छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरच्या तहात २३ किल्ले हरले होेते. रयतेने विचार केला की, आता स्वराज्य गेले. मात्र, शिवाजी महाराज लढले आणि तहात हरलेले किल्ले परत जिंकले. आता तशीच वेळ आहे.
फटे लेकीन हटे नहीं : राऊत
‘फटे लेकीन हटे नहीं’ ही आम्हा शिवसैनिकांची ओळख आहे. संजय राऊत तुरुंगात गेले; पण हटले नाहीत, ही बाळासाहेबांची प्रेरणा आहे. सद्य:स्थितीत महाराष्ट्रापुढे राजकीय-सामाजिक संघर्ष वाढवून ठेवला आहे. आपल्या हक्काचे दुसरीकडे ओढून नेले जात आहे. लोकशाही आणि महाराष्ट्राची अस्मिता वाचवायची असेल तर महाविकास आघाडीच्या पाठीशी राहा. आपण इतिहास घडवूच, असे संजय राऊत म्हणाले.
शिरूरची चिंता मिटली : शरद पवार
शरद पवार म्हणाले की, आमदार विलास लांडे यांच्या कंपनीत तीन हजार कामगार काम करीत आहेत, असे आताच त्यांनी सांगितले. हे ऐकून आता माझी ‘शिरूर लोकसभे’ची चिंता मिटली आहे. शिरूरसाठी डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागे कोणीतरी पाहिजे होता. तो मला मिळाला आहे. सुप्रिया सुळेंना राज्यसभेत पाठवायचा निर्णय घेतला, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. बाळासाहेबांचा शिवसैनिक शब्दाला पक्का आहे. समाजाचा विचार करणारे जे खासदार-आमदार होते, त्यात गजानन बाबर होते. दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाचा खासदार, आमदार आला तर पक्ष न पाहता आम्ही काम करायचो, हे राजकीय समीकरण होते; मात्र आता हे चित्र बदलले आहे.