स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांवर महाराष्ट्राची मोहोर, सासवड देशात प्रथम; लोणावळा तिसऱ्या स्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 11:27 AM2024-01-12T11:27:35+5:302024-01-12T11:28:10+5:30
याबद्दल उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुरस्कारप्राप्त नगर परिषदा आणि महानगरपालिकांचे अभिनंदन केले आहे...
पुणे : स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारामध्ये यंदा महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांत सासवडने देशात पहिले तर लोणावळा शहराने देशात तिसरे स्थान पटकावले आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुरस्कारप्राप्त नगर परिषदा आणि महानगरपालिकांचे अभिनंदन केले आहे.
नवी दिल्ली येथील भारत मंडपम् येथे झालेल्या सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डाॅ. के. एच. गोविंदराज यांनी स्वीकारला. पुणे जिल्ह्याचा पुरस्कार जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी स्वीकारला.
राष्ट्रीय स्तरावरील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुरस्कारांपैकी तीन पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले असून, यात सासवड नगरपालिका तसेच लोणावळा नगर परिषदेचा समावेश आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वच्छतेसह एसटीपी उभारणी, शहर व नदी किनारा सौंदर्यीकरण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकटीकरण, यंत्रणांचे आधुनिकीकरण, जल व्यवस्थापन आदी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्याची दखल घेत पुणे महापालिकेला फाइव्ह स्टार मानांकनासह स्वच्छतेत १० वा क्रमांक तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेला फाइव्ह स्टार मानांकन आणि वॉटरप्लस मानांकनासह स्वच्छतेत १३ वा क्रमांक मिळाला आहे.
एक लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्वच्छतेचे मानांकन प्राप्त प्रथम १० शहरांपैकी आठ शहरे महाराष्ट्रातील असून, यामध्ये सासवड, लोणावळासह अन्य शहरांचा समावेश आहे.