Maharashtra Winter: २ दिवस राहणार थंडीचा कडाका; पारा आणखी घसरणार नाही, हवामानतज्ज्ञांचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 12:38 PM2024-12-01T12:38:23+5:302024-12-01T12:38:40+5:30
राज्यात शनिवारी पुणे, नाशिक या दोनच शहरांचे तापमान १० अंशांच्या खाली गेले, तर बऱ्याच शहरांचे तापमान ११ ते १५ अंशादरम्यान नोंदवले गेले
पुणे : राज्यातील किमान तापमानाचा पारा आता चांगलाच घसरला असला तरी पुढील काही दिवसांमध्ये तो असाच स्थिर राहण्याची शक्यता आहे. यापेक्षा किमान तापमान घसरणार नाही, असा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिला. राज्यामध्ये शनिवारी (दि.३०) नाशिक येथे ८.९ या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली.
‘फेंगल’ चक्रीवादळ तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीला कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान आज धडकले. त्यामुळे त्या भागात काही ठिकाणी पाऊस झाला. दरम्यान, राज्यात थंडीचा कडाका कायम आहे. पण सोमवार, मंगळवार आणि बुधवारी राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
राज्यातही सोमवार, मंगळवार आणि बुधवारी काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. सोमवारी (दि.२) सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला. तर मंगळवारी (दि.३) सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
राज्यात शनिवारी पुणे, नाशिक या दोनच शहरांचे तापमान १० अंशांच्या खाली गेले. तर बऱ्याच शहरांचे तापमान ११ ते १५ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले. फेंगल वादळ जमिनीवर आल्याने आता तापमानाचा पारा आणखी घसरणार नाही, असा अंदाज डॉ. कश्यपी यांनी दिला.
राज्यातील किमान तापमान
पुणे : ९.७
अहिल्यानगर : १०.७
जळगाव : ११.९
कोल्हापूर : १६.७
महाबळेश्वर : ११.५
नाशिक : ८.९
सोलापूर : १७.२
मुंबई : २१.२
अकोला : १२.७
नागपूर : १३.६