Maharashtra: महत्त्वाची बातमी! मुसळधार पावसामुळे दहावी, बारावी परीक्षा पुढे ढककल्या; शाळांनाही सुट्टी
By प्रशांत बिडवे | Published: July 19, 2023 09:28 PM2023-07-19T21:28:21+5:302023-07-19T21:29:44+5:30
राज्यात गत दाेन दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे...
पुणे : हवामान विभागाने राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी देण्याबाबत निर्णय घ्यावा, असे पत्र राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. तसेच गुरूवारी दि. २० राेजी हाेणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचे पेपरही पुढे ढकलण्यात आल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
राज्यात गत दाेन दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. दरम्यान, काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला असून हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्याअनुषंगाने पावसामुळे मुलांची शाळेत जाण्या-येण्याची गैरसोय होउ शकते, त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शिक्षण आयुक्तांनी सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्या जिल्ह्यातील पावसाची स्थिती पाहून शाळेला सुट्टी देण्याबाबत निर्णय घ्यावा असे शिक्षण आयुक्तांनी पत्रात नमूद केले आहे.
दहावी,बारावी पुरवणी परिक्षा पुढे ढककल्या
हवामान विभागाने राज्यातील काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला असून त्या पार्श्वभूमीवर आज दि. २० जुलै राेजी हाेणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावी च्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. गुरूवारी हाेणारा दहावीचा पेपर येत्या २ ऑगस्ट तर बारावीचा पेपर दि. ११ ऑगस्ट राेजी हाेतील अशी माहिती राज्य मंडळाच्या वतीने देण्यात आली.