प्रबोधनात महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे
By admin | Published: May 15, 2016 12:30 AM2016-05-15T00:30:44+5:302016-05-15T00:30:44+5:30
धार्मिक, सामाजिक, राजकीय, प्रबोधनाच्या चळवळीत महाराष्ट्राने दिलेले योगदान महत्त्वपूर्ण व देशपातळीवरचे आहे. बाळशास्त्री जांभेकरांनी साहित्याच्या माध्यमातून प्रबोधन करण्यास प्रारंभ
पिंपरी : धार्मिक, सामाजिक, राजकीय, प्रबोधनाच्या चळवळीत महाराष्ट्राने दिलेले योगदान महत्त्वपूर्ण व देशपातळीवरचे आहे. बाळशास्त्री जांभेकरांनी साहित्याच्या माध्यमातून प्रबोधन करण्यास प्रारंभ केल्याने त्यांना महाराष्ट्रातील प्रबोधनाचे जनक म्हणावे लागेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
चिंचवड गावातील गांधी पेठ तालीम मित्र मंडळ आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेत डॉ. मोरे यांनी ‘महाराष्ट्रातील प्रबोधनाची परंपरा’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफले. व्याख्यानमालेचे उद्घाटन शुक्रवारी आमदार लक्ष्मण जगताप व संत ज्ञानेश्वरमहाराज संस्थानचे विश्वस्त डॉ.अभय टिळक यांच्या हस्ते झाले. मिलिंद एकबोटे, मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, भाऊसाहेब भोईर, गजानन चिंचवडे, सुहास पोफळे, दत्ता वाघेरे आदी उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले की, प्रबोधनाचे नाते आधुनिकतेशी आहे. प्रबोधन करणाऱ्या विचारवंतांना त्रास झाला; मात्र त्यांनी माणसाला प्रतिष्ठेची जाणीव करून दिली. महाराष्ट्रात तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरमहाराज, संत नामदेवमहाराज यांनी कीर्तनातून प्रबोधन केले. छत्रपती शिवरायांनी राजकीय व सांस्कृतिक प्रबोधन केले. ब्रिटिश काळात प्रबोधनाची गरज निर्माण झाली. बंगालनंतर महाराष्ट्रात प्रबोधनाची सुरुवात झाली. १८३२मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ वृत्तपत्र सुरू केले. महाराष्ट्राचा धर्मग्रंथ असलेल्या ज्ञानेश्वरीचे पहिले मुद्रण केले. संत साहित्यातून धार्मिक प्रबोधन केले. म्हणून बाळशास्त्री जांभेकरांना प्रबोधनाचे जनक म्हणावे लागेल. एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारक हे धर्मसुधारक होते. दादोबा पांडुरंग तर्खडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हीच भूमिका मांडली.
विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळकांनी केलेले राजकीय प्रबोधन याचा उल्लेख मोरे यांनी केला. आर्थिक व्यवस्था हा पाया असल्याचे सांगत मार्क्सवाद आला. कामगार संघटनेमार्फत आर्थिक प्रबोधन केले गेले. डॉ. आंबेडकरांनी धार्मिक, सामाजिक व राजकीय असे एकत्रित प्रबोधन केले. एकूणच महाराष्ट्राचे प्रबोधन संदर्भातील योगदान देशपातळीचे आहे. भारताचे नेतृत्व महाराष्ट्राकडे असले पाहिजे. मात्र, दुफळी, भाषेकडे दुर्लक्ष, इंग्रजी शाळांचा वाढता प्रभाव ही अडचण असल्याचे मोरे म्हणाले.
आमदार जगताप व डॉ. टिळक यांनी मनोगत व्यक्त केले. भोईर यांनी व्याख्यानमाला सुरु करताना आलेले अनुभव व्यक्त केले. (प्रतिनिधी)