महाराष्ट्राचे सुपूत्र महेश भागवत यांचा जागतिक पातळीवर गाैरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 09:00 PM2018-05-15T21:00:37+5:302018-05-15T21:00:37+5:30
महाराष्ट्राचे सुपूत्र असलेले हैद्राबादचे पाेलिस अायुक्त महेश भागवत यांच्या मानवी तस्करी राेखण्याबाबतच्या कामाला जागतिक पातळीवर गाैरविण्यात अाले अाहे.
पुणे : महाराष्ट्राचे सुपूत्र असलेले हैद्राबादचे पाेलिस अायुक्त महेश भागवत यांच्या मानवी तस्करी राेखण्याबाबतच्या कामाला जागतिक पातळीवर गाैरविण्यात अाले अाहे. भागवत यांची गणना जगातील अवैध मानवी वाहतूकीला अाळा घालणाऱ्या जगभरातील 100 प्रभावी व्यक्तीमत्वांमध्ये करण्यात अाली अाहे. अमेरिकेतील असेंट कम्प्लायन्स या संस्थेच्यावतीने त्यांची निवड करण्यात अाली अाहे. या अाधी सुद्धा भागवत यांना अमेरीका सरकारचा ट्रॅफिकिंग इन पर्सन रिपाेर्ट हिराे हा पुरस्कारही त्यांना मिळाला अाहे. 2004 पासून भागवत हे मानवी तस्करी राेखण्याचे काम करत असून त्यांनी भारतातील विविध शहरांमध्ये अात्तापर्यंत हे कार्य केले अाहे.
अवैध मानवी वाहतूक माेठ्याप्रमाणावर हाेत असते. त्याला अाळा घालणे हे पाेलिसांसमाेरील माेठे अाव्हान अाहे. भागवतांनी अवैध मानवी वाहतूक राेखण्याच्या कामाची सुरुवात हैद्राबादमधून केली. त्यानंतर त्यांनी त्यावेळच्या अांध्रप्रदेशच्या विविध भागांमध्ये अवैध मानवी वाहतूक राेखण्याबाबत माेहिम उघडली. त्यांनी गुन्हेअन्वेशन विभागाच्या महिला सेलसाेबतही काम केले. संयुक्त राष्ट्र अाणि गृहमंत्रालयाच्या सहकार्याने त्यांना भारतातील बैंगलाेर, दिल्ली, मुंबई, पुणे या शहरांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पाेलीसांना स्थानिक सरकार अाणि समासजेवी संस्थाच्या मदतीची गरज असते. अवैध मानवी वाहतूक राेखणे म्हणजे केवळ महिलांची साेडवणूक नाही तर त्यांचे सुरक्षित जागी पुर्नवसन करणे तितकेच महत्त्वाचे असते असे भागवतांचे म्हणणे अाहे. पाेलीसांचे काम हे त्या व्यक्तीला साेडवूण अाणणे असते. सरकारने त्या व्यक्तीला संरक्षण देणे गरजेचे असते. त्याचबराेबर साेडवणूक करुन अाणलेल्या महिलेने पुन्हा त्या मार्गाकडेवळू नये यासाठी त्यांचे याेग्य पुर्नवसनही तितकेच महत्त्वाचे अाहे असे भागवतांना वाटते. साेडवणूक केलेल्या महिलेला अार्थिक मदत मिळेल याकडेही ते लक्ष देत असतात. अनेक स्वयंसेवी संस्था साेडवणूक करुन अाणलेल्या महिलांचे तसेच मुलांचे पुर्नवसन करण्यासाठी माेलाची साथ करत असल्याचेही भागवत अावर्जून नमूद करतात. त्याचबराेबर महिलेला तस्करांपासून साेडवून अाणून त्यांना काेर्टात साक्ष देण्यास उभे करणे हेही अत्यंत अावश्यक असल्याचे भागवतांचे मत अाहे.
लाेकमतशी बाेलताना भागवत म्हणाले, पुण्यात शिक्षण घेत असताना नरेंद्र दाभाेलकर, मेधा पाटकर यांच्यासाेबत अनेक उपक्रमांमध्ये सहभागी झालाे हाेताे. तेथूनच एक सामाजिक भान मनात निर्माण झाले हाेते. 2004 सालापासून अवैध मानवी वाहतूक राेखण्याचे काम करण्यास सुरुवात केली. हैद्राबाद येथे पाेलीस उपायुक्त असताना अनेक ठिकाणी धाडी घालून महिलांची सुटका केली. हा संघटित गुन्हा असल्याने त्याची उकल करणे अनेकदा अवघड जाते. या मानवी वाहतूकीमध्ये लहान मुला-मुलींचे प्रमाणही अधिक असते. अश्यावेळी या मुलांची सुटका करुन त्यांच्यासाठी शाळा सुरु करण्याचे काम अाम्ही करताे. अवैध मानवी वाहतूकीतून सुटका केलेल्या महिलांचे पुनर्वसन करणे खूप गरजेचे अाहे. त्याचबराेबर या अवैध वाहतूकीच्या सूत्रधाराला पकडून मूळापासूनच या समस्येला उपटून टाकण्याचा माझा प्रयत्न अाहे. जागतिक पातळीवर कामाची दखल घेतल्याने अानंद अाहे. पुढेही या गुन्हेगारीला हद्दपार करण्यासाठी सतत कार्यरत राहणार अाहे.