महाराष्ट्राच्या विक्रमादित्यला विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 02:19 AM2018-10-01T02:19:28+5:302018-10-01T02:20:09+5:30
बुद्धिबळ : अखिल भारतीय खुली फिडे रेटिंग स्पर्धा
पुणे : बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टतर्फे आयोजित १५व्या श्री महेश्वरानंद सरस्वती स्मृती अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत इंटरनॅशनल मास्टर महाराष्ट्राचा विक्रमादित्य कुलकर्णी याने ८ गुणांसह रविवारी विजेतेपद पटकावले.
कर्वे रस्त्यावरील अश्वमेध सभागृहात ही स्पर्धा झाली. नवव्या फेरीत सहाव्या मानांकित मास्टर विक्रमादित्यने तामिळनाडूच्या हरिकृष्णन ए.आरए याला बरोबरीत रोखले. ३६ वर्षीय विक्रमादित्यने रिव्हर्स बेनॉनी पध्दतीने सुरूवात करत हरिकृष्णनला ३0 चालींमध्ये बरोबरीत रोखले. कोल्हापूरच्या सम्मेद शेटे याने सीआरएसबीच्या एजीएम किरण पंडीतरावचा पराभव करून ७.५गुणांसह व ४३.00बुकोल्स कट गुण सरासरीच्या आधारावर दुसरा क्रमांक पटकावला. महाराष्ट्राच्या इंद्रजीत महिंद्रकर व आयएम समीर काठमळे यांनी अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक पटकावला. विजेत्या विक्रमादित्यला १ लाख रुपये, तर उपविजेत्या सम्मेद शेटेला ६० हजार रूपयांचे पारितोषिक मिळाले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महापालिकेच्या विधी समिती अध्यक्षा माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंदार देवगावकर, पीडीसीसीचे सचिव राजेंद्र कोंडे, बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश कुंटे, नितीन शेणवी, विनिता शोत्री उपस्थित होते.