‘महाराष्ट्रीय फ्युजन-काश्मिरी फ्युजन’ नृत्याचा सुंदर आविष्कार; जिंकली पुणेकरांची मने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 01:30 PM2018-01-29T13:30:54+5:302018-01-29T13:34:08+5:30
सरहद आणि अरहाम फाउंडेशन आयोजित आणि जम्मू-काश्मीर कला, संस्कृती, भाषा अकादमी व जम्मू-काश्मीर टुरिझम यांच्या सहयोगाने सुरू असलेल्या अकरावा काश्मीर महोत्सव सोहळा रंगला.
पुणे : महाराष्ट्रीय फ्युजन-काश्मिरी फ्युजन नृत्याचा सुंदर आविष्कार... ५६ वर्षांच्या नृत्यांगना यांचे काश्मिरी वाद्यांच्या पार्श्वभूमीवर रंगलेले नृत्य... काश्मीरचा पारंपरिक महिलांसाठीचा खास असा रोफ नृत्य प्रकार.. आणि ‘भांड पथर’ हा अस्सल काश्मिरी कला प्रकार आज संध्याकाळी पुणेकरांनी अनुभवला!
सरहद आणि अरहाम फाउंडेशन आयोजित आणि जम्मू-काश्मीर कला, संस्कृती, भाषा अकादमी व जम्मू-काश्मीर टुरिझम यांच्या सहयोगाने सुरू असलेल्या अकराव्या काश्मीर महोत्सवात हा सोहळा रंगला. अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात खास जम्मू-काश्मीरहून आलेल्या ३० कलाकारांनी आपली कला सादर केली. सरहद शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीयन आणि काश्मिरी नृत्यप्रकार सादर केले. रमजान व इतर सण-समारंभात आवर्जून केल्या जाणाऱ्या रोफ नृत्य प्रकाराची ओळख पुणेकरांना काश्मिरी व्हॅलीतून आलेल्या नृत्यांगणांनी करून दिली.
रबाब, सारंगी, मटका, तुंबकनाडी, शहनाई आदी वाद्यांचे सुरेल स्वरही पुणेकरांना या महोत्सवात ऐकायला मिळाले.
गुलाम रसूल भट, आमिर अहमद, अब्दुल शेख, गुलबर्ग, मंजूर अहमद, निसार अहमद, मोहम्मद मकमुल आदी कलाकारांनी आपली कला या महोत्सवात सादर केली.
या वेळी जम्मू-काश्मीर कला-संस्कृती-भाषा अकादमीचे समन्वयक शब्बीर भट, रोफ डान्स ग्रुप आॅफ काश्मीरचे गुलजार भट, सामाजिक कार्यकर्ते युवराज शहा, सरहदचे संजय नहार, सुषमा नहार व अन्य मान्यवर उपस्थित होते. जाहिद भट यांनी निवेदन केले.