महारेराचे कामकाज ३० जूनपर्यंत बंद राहणार : अपिलेट ट्रिब्युनल सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 06:01 PM2020-06-10T18:01:24+5:302020-06-10T18:07:04+5:30
तातडीच्या प्रकरणांच्या सुनावणीसाठीचा अर्ज महारेरा सचिवांकडे त्यांच्या-ईमेल आयडीवर सादर करता येईल
पुणे : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत पाचवा लॉकडाऊन घोषित केला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे (महारेरा) कामकाज तोपर्यंत बंद राहणार आहे. याबाबत महारेराचे सचिव डॉ. वसंत प्रभू यांनी परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत. अपिलेट ट्रिब्युनल सोमवारपासून (दि.8) सुरू झाले आहे. पुढील आदेश येईपर्यंत दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी हे सुरू असणार आहे. जे वादी-प्रतिवादी अंशत: सुनावणी अथवा अंतिम सुनावणी घेण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांना अपिलेट ट्रिब्युनला आगाऊ कळवावे लागणार आहे. त्यानंतर त्यावरील सुनावणी घेण्यात येणार असल्याचे रेरा प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. निलेश बोराटे यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यापासून जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.देशात सुरुवातीला १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला. मात्र,कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकारने लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला. त्यानंतर १७ मेपर्यंत, त्यानंतर३१ मेपर्यंत वाढविण्यात आला. आता ३० जूनपर्यंत पाचवा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. याच धर्तीवर कार्यालयात होणारी गर्दी टाळून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महारेरा बंद राहणार आहे. मात्र, प्रकल्प नोंदणी, एजंट नोंदणी, विस्तार दुरुस्ती कार्य यासारख्या सेवा ऑनलाईन सुरू राहणार आहेत. पाचवे लॉकडाऊन संपल्यानंतर शासनाच्या निदेर्शानुसार महारेराच्या कामकाज बाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. बोराटे म्हणाले, बंदच्या कालावधीतही तातडीच्या प्रकरणे घेतली जाणार आहेत.
याबाबतचा निर्णय प्राधिकरणाच्या पूर्ण खंडपीठाकडून घेतला जाईल. तातडीच्या प्रकरणांच्या सुनावणीसाठीचा अर्ज महारेरा सचिवांकडे त्यांच्या-ईमेल आयडीवर सादर करता येईल. महारेराने निकाल दिल्यानंतर त्या निकालविरोधात बिल्डर अथवा ग्राहकाने अपील केल्यानंतर अपिलेट ट्रिब्युनलमध्ये सुनावणी होत असते. ते सुरू झाले आहे.