महासंग्राम उद्यापासून सुरू

By Admin | Published: January 26, 2017 01:05 AM2017-01-26T01:05:22+5:302017-01-26T01:05:22+5:30

राज्यातील दहा महापालिका निवडणुकांसाठी उद्या शुक्रवार, दि. २७ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे.

Mahasangram starts from tomorrow | महासंग्राम उद्यापासून सुरू

महासंग्राम उद्यापासून सुरू

googlenewsNext

पुणे : राज्यातील दहा महापालिका निवडणुकांसाठी उद्या शुक्रवार, दि. २७ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांकडून याद्या जाहीर होण्याची प्रतीक्षा केली जात आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून शहरातील १४ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
क्षेत्रीय कार्यालयानिहाय ठरवून दिलेल्या प्रभागांमध्ये सकाळी ११ ते ३ या वेळेत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी यंदा प्रथमच आॅनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. आॅनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून ती क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करायची आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी पाच हजार रुपये, तर आरक्षित जागेवरील उमेदवाराला अडीच हजार रुपये अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे.
उमेदवारांनी अर्जासोबत दोन शपथपत्रे सादर करावयाची आहेत. मालमत्तेसंबंधीचे विवरण आणि गुन्हे दाखल असल्यास त्याची माहिती अर्जासोबत जोडून द्यायची आहे. तसेच सन २००२ नंतर तीनपेक्षा जास्त अपत्ये नसल्याचा दाखला उमेदवारी अर्जासोबत जोडावा लागणार आहे. खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडून त्याद्वारे खर्चाच्या नोंदी कराव्या लागणार आहेत. एबी फॉर्म उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जमा करण्याची सवलत यंदा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाचे प्रमुख सतीश कुलकर्णी यांनी दिली.
आॅनलाइन उमेदवारी अर्ज कुठूनही भरण्याची सुविधा उपलब्ध आहे, आॅनलाइन अर्ज भरण्यास उशीर करून शेवटच्या दिवशी आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी गर्दी झाल्यास त्या दिवशी सर्व्हरवर ताण येऊन त्याची गती संथ होऊ शकते. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लगेच उमेदवारी अर्ज भरावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे महापालिकेची कोणतीही थकबाकी नाही, याचा दाखला त्यांना द्यावा लागणार आहे. महापालिकेच्या एलबीटी विभागात अर्ज केल्यास संबंधित उमेदवाराकडे थकबाकी नसल्याचा दाखला उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज आॅनलाइन पद्धतीने भरायचे असले तरी माघार घ्यायची असल्यास मात्र स्वत: उपस्थित राहून अर्ज करावा लागणार असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. एकाच पक्षाचे दोन उमेदवारांनी एबी फॉर्म सादर केल्यास ज्याचा पहिला फॉर्म आला असेल तो अधिकृत मानला जाणार आहे.

Web Title: Mahasangram starts from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.