महाशिवरात्रीला भीमाशंकर विकासाचा शुभारंभ!
By admin | Published: September 1, 2015 03:54 AM2015-09-01T03:54:44+5:302015-09-01T03:54:44+5:30
श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसर विकासाचा आराखडा तयार करून त्यात समाविष्ट असणाऱ्या कामांचे भूमिपूजन येणाऱ्या महाशिवरात्रीपासून सुरू करू व २०१८च्या महाशिवरात्रीपर्यंत कामे पूर्ण करू
भीमाशंकर : श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसर विकासाचा आराखडा तयार करून त्यात समाविष्ट असणाऱ्या कामांचे भूमिपूजन येणाऱ्या महाशिवरात्रीपासून सुरू करू व २०१८च्या महाशिवरात्रीपर्यंत कामे पूर्ण करू, असे आश्वासन राज्याचे अर्थ, नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिले.
डिंभे येथे श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसर विकास आराखड्यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, खेडचे आमदार सुरेश गोरे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, उपजिल्हाधिकारी प्रदीप पाटील, मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, जीतसिंग, जिल्हा नियोजन अधिकारी पी. आर. केंभावी, देवस्थानाचे कार्यकारी विश्वस्त प्रशांत आवटे, खेडचे प्रांत अधिकारी हिंमतराव खराडे, आंबेगावचे प्रांत अधिकारी कल्याणराव पांढरे, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, जे. जी. विभुते, उपअभियंता एस. बी. देवढे आदी उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले, ‘‘भीमाशंकरमधील कामे वन विभागाच्या जाचक अडचणींमुळे रखडली आहेत. परंतु, ही कामे मार्गी लावण्याच्या ठोस निर्णयाची आजपासून आम्ही सरूवात करणार आहोत’’.
या वेळी दिलीप वळसे-पाटील म्हणाले, ‘‘भीमाशंकर परिसर विकास हा वन विभागाच्या हरकती, परिसरात असलेल्या आदिवासींच्या जमिनी, इको सेन्सेटिव्ह झोनच्या अडचणीमुळे होत नाही. वन विभागाची परवानगी वेळेत आणण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांना ठरवून दिली पाहिजे.’’
खेडचे आमदार सुरेश गोरे म्हणाले, की भीमाशंकरला जाण्यासाठी भोरगिरीमार्गे भीमाशंकर हा पर्यायी रस्ता होऊ शकतो. याबाबतचा प्रस्ताव वन विभागाकडे पाठविला आहे त्याला लवकर परवागनी मिळावी. तसेच, तळेघरमार्गे जाताना घाटातील वळणे काढण्यासही परवानगी मिळावी. (वार्ताहर)