तरुण जगभर फिरत देतोय महात्मा गांधींच्या शांततेचा संदेश; आतापर्यंत तब्बल ४६ देशांचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 05:16 PM2021-10-03T17:16:22+5:302021-10-03T17:22:47+5:30
जगभरातील विविध देशातून ५ वर्षांपासून चालू शांती यात्रा; १७ नोव्हेंबरला यात्रेचा समारोप होणार
पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधीचे विचार, शिकवण, त्यांचे कार्य जाणून घेण्यासाठी असंख्य तरुण - तरुणी या थोरपुरुषाचा अभ्यास करू लागले आहेत. त्यांची पुस्तक वाचण्याबरोबरच गांधीजींचे पुतळे, ग्रंथालये, आश्रम, संग्रहालये यांना भेटी देण्याकडेही तरुणांचा कल वाढू लागला आहे. राष्ट्रपित्याचा अहिंसा आणि शांततेचा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी एका तरुणानं शांती यात्रेला सुरुवात केली.
जगभरातील विविध देशांमधून ५ वर्षांपासून शांती यात्रा सुरु असून आतापर्यंत तब्बल ४६ देशांचा प्रवास या तरुणाने पूर्ण केला आहे. १७ नोव्हेंबरला तिचा समारोप होणार असल्याचे त्याने लोकमतशी बोलताना सांगितलं. नितीन सोनवणे असं या तरुणाचं नाव आहे. तो मूळचा अहमदनगरचा असून पुण्यातील कोथरूड येथे असणाऱ्या महाराष्ट्र गांधी स्मारक निधी या स्वयंसेवी संस्थेत कार्यरत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राशीन गावात नितीन सोनवणेचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर महाविद्दयालयातून अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ६ महिने इंजिनिअर म्ह्णून काम केले. राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल जाणून घेण्याची फारच इच्छा होती. त्यानुसार गांधीजींची पुस्तके वाचण्यास सुरुवात केली. थोर राष्ट्रपित्याबद्दल माहिती मिळवत असताना नितीनला पुण्यातील महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे कार्य कानावर पडू लागले. त्यावेळी नितीनने या स्वयंसेवी संस्थेत जाण्याचे ठरवले. २०१५ सालीचा महाराष्ट्र गांधी स्मारक निधीमार्फत स्वयंसेवी कार्यास सुरुवात केली. गांधीजींचे विचार, स्वातंत्र्यपूर्व काळातील शांततेच्या मार्गाचा लढा, जगभरातील त्यांचे स्थान, आपल्या देशाबरोबरच परदेशातही होणारा त्यांचा अभ्यास, जगातील शालेय पुस्तकात गांधीबद्दल दिली गेलेली माहिती या सर्व गोष्टींमुळे गांधीजींना जवळून जाणून घेण्यास आवड निर्माण झाली. त्याच पार्श्वभूमीवर १८ नोव्हेंबर २०१६ साली वर्धा येथील गांधीग्राम आश्रम येथून शांती यात्रेला सुरुवात केली.
आतापर्यंत ४६ देशांचा प्रवास
''महात्मा गांधींची १५० वी जयंती साजरी करण्यासाठी पायी आणि सायकलवरून जगभर फिरत आहे. आतापर्यंत मी ४६ देशांचा प्रवास केला आहे. त्यांचा अहिंसा आणि शांततेचा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी दक्षिण अमेरिकेतील थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन, हाँगकाँग, मकाऊ, जपान (टोकियो ते हिरोशिमा), दक्षिण कोरिया, अमेरिका, मेक्सिको, ग्वाटेमाला, होंडुरास, अल साल्वाडोर, निकाराग्वा, कोस्टा रिका, पनामा, कोलंबिया, इक्वाडोर आणि पेरू या देशात प्रवास केला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, झांबिया, टांझानिया, रवांडा, युगांडा, केनिया, इथिओपिया, सुदान, इजिप्त, इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड, जर्मनी, स्पेन, पोर्तुगाल, जॉर्जिया, तुर्की, सर्बिया येथून चालत सुरुवात केली. मॅसेडोनिया, अल्बेनिया, मॉन्टेनेग्रो, किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान नंतर भारतातून दिल्लीवरून प्रवास सुरु आहे. १७ नोव्हेंबरला यात्रेचा समारोप होणार असल्याचे सोनवणे याने सांगितलं आहे.''
''राष्ट्रपिता महात्मा गांधींना भारताबरोबरच जगभरात आदराने पाहिले जाते. अनेक देशांमधील शाळा, महाविद्यालय याठिकाणी गांधीजींचा इतिहास, त्यांची शिकवण याची उत्तम माहिती दिली जाते. माझी शांती यात्रा सुरु असताना परदेशातील अनेक नागरिक माझ्याबरोबर यात्रेत सहभागी झाले. अनेक, संस्था, शाळा, यांच्या भेटीगाठी माझ्यासाठी वेगळाच अनुभव होता. पुढच्या महिन्यात माझा प्रवास संपणार आहे. असे त्याने यावेळी सांगितलं आहे.''