महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा एकत्रित विकास करणार
By राजू हिंगे | Published: June 21, 2024 08:28 PM2024-06-21T20:28:31+5:302024-06-21T20:28:53+5:30
दोन्ही स्मारक एकत्रित विकास करण्यासाठी १० हजार ९४२ चौरस मीटर क्षेत्र संपादीत करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला
पुणे: शहराच्या मध्यवस्तीमधील गंज पेठेत महात्मा ज्योतिराव फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे दिडशे मीटर अंतरावरच वेगवेगळी स्मारक आहेत. ही दोन्ही स्मारक एकत्रित विकास करण्यासाठी १० हजार ९४२ चौरस मीटर क्षेत्र संपादीत करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. या जागेवर आजमितीला जुनी घरे आणि वाडे असून तिथे ५१६ घर मालक तर २८६ भाडेकरू अशी सुमारे ८०२ कुटुंब वास्तव्यास आहेत. येथील रहिवाश्यांचे सामंजस्यांने भूसंपादन केले जाणार आहे.
गंज पेठेत महात्मा फुले वाडा आहे. या वाड्याशेजारी अवघ्या दिडशे मीटर अंतरावर महापालिकेने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारले आहे. हा वाडा आणि स्मारकाला रोज नागरिक भेट देण्यासाठी येतात. मात्र येथे वाहतुक व वाहनतळासाठी प्रशस्त जागा नसल्याने व नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे या दोन्ही स्मारकांचा विस्तार आणि या वास्तूंसाठी जोडरस्ता तातडीने विकसित करण्याची गरज असल्याची मागणी सातत्याने केली जात होती. या दोन्ही स्मारकांच्या मध्ये निवासी भाग आहे. वर्षानुवर्षे याठिकाणी राहाणार्या नागरिकांचे पुनर्वसन अथवा त्यांना योग्य मोबदला देउन ही दोन्ही स्मारके जोडून आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी आता थेट संपूर्ण परिसर मोकळा करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे.
भुसंपादनाचा खर्च राज्यसरकार करणार
या स्मारकाच्या विकसनासंदर्भात नुकतीच उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीमध्ये स्मारक परिसराच्याच्या आरक्षण मान्य करण्यात आले आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी आवश्यक जागेच्या संपादनाला सुरुवात करण्याचे आदेश दिले आहेत. भुसपंदनाचा खर्च राज्यसरकार करणार आहे. यासंदर्भाने आज स्थानीक क्षेत्रिय अधिकारी आणि अभियंत्यांची बैठक घेतली. घर मालक आणि भाडेकरूंसोबत संवाद साधून भूसंपादनाचा तोडगा काढण्यात येईल. तत्पुर्वी संबधित घरमालक आणि भाडेकरूंना नोटीसेस पाठविण्यात येतील. सर्व संमतीनेच संपादनाची प्रक्रिया करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त डॉ. राजेेंद्र भोसले आणि शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले.
महात्मा ज्योतिराव फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक एकत्र करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. त्यासंदर्भात भूसंपादन करण्याच्याही सुचना दिल्या आहेत. येथील रहिवाश्यांचे सामंजस्यांने भूसंपादनाचा अमाचा प्रयत्न असणार आहे.- डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त , पुणे महापालिका