लेखक, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना ‘महात्मा फुले समता’ पुरस्कार जाहीर
By नम्रता फडणीस | Published: November 26, 2024 03:36 PM2024-11-26T15:36:50+5:302024-11-26T15:38:09+5:30
आमदार छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी १०.३० वाजता फुले वाडा येथील समता भूमी येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार
पुणे : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी दिला जाणारा 'महात्मा फुले समता पुरस्कार’ यंदाच्या वर्षी प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांना जाहीर झाला आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. २८) सकाळी १०.३० वाजता फुले वाडा येथील समता भूमी येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार असल्याची माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रीतेश गवळी, शहर अध्यक्ष पंढरीनाथ बनकर, महिला शहर अध्यक्ष वैष्णवी सातव यांनी दिली आहे. रुपये एक लाख, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे
यंदाच्या वर्षी या पुरस्कारासाठी लेखक, दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे यांची निवड करण्यात आली आहे. नागराज मंजुळे यांनी आपल्या चित्रपट सृष्टीतील कार्यातून महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा सामाजिक वारसा विकसित केला आहे.
नागराज मंजुळे यांनी 'पिस्तुल्या' या लघुपटापासून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. या लघुपटासाठी त्यांना नॉन-फीचर फिल्म श्रेणीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेले 'फँड्री', 'सैराट', 'पावसाचा निबंध', 'झुंड' हे चित्रपट विशेष गाजले आहेत. यापैकी अनेक सिनेमांच्या निर्मिती आणि लेखनाचीही जबाबदारी मंजुळे यांनी सांभाळली आहे. 'नाळ', 'नाळ २', 'तार', 'घर बंदूक बिर्याणी' या सिनेमामध्ये त्यांचा उत्तम अभिनय पाहायला मिळाला. 'सैराट'साठी त्यांना २०१७ चा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाचा चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार २०२२ त्यांना प्रदान करण्यात आला.