'महात्मा' पदवी 'भारतरत्न'पेक्षाही मोठी, तज्ज्ञांचा भाजपावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 01:12 PM2019-10-18T13:12:26+5:302019-10-18T13:58:16+5:30

जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले यांच्या उल्लेखामुळे टीका

Mahatma 'title is greater than' Bharat Ratna ' | 'महात्मा' पदवी 'भारतरत्न'पेक्षाही मोठी, तज्ज्ञांचा भाजपावर निशाणा

'महात्मा' पदवी 'भारतरत्न'पेक्षाही मोठी, तज्ज्ञांचा भाजपावर निशाणा

Next
ठळक मुद्देमहात्मा फुलेंना  ‘भारतरत्न’ देण्याची संकल्पनाम्यात घोषणा करायची, हा दुटप्पीपणा

पुणे : महात्मा फुले यांची आता आठवण आली का? यापूर्वी केंद्र आणि राज्यात भाजपाचेचसरकार होते; मग का फुलेंना ‘भारतरत्न’ दिले गेले नाही? एकीकडे मागासवर्गीय मुला-मुलींच्या शैक्षणिक निधीत कपात करायची आणि याच मुलांच्या शिक्षणासाठी अव्याहतपणे काम करणाऱ्या महात्मा फुलेंना  ‘भारतरत्न’ देण्याची संकल्पनाम्यात घोषणा करायची, हा दुटप्पीपणा आहे. मुळात महात्मा फुले यांना मिळालेली  ‘महात्मा’ ही पदवी ‘भारतरत्न’पेक्षाही मोठी आहे, अशा शब्दांत मान्यवरांनी टीकास्त्र सोडले. भाजपाने पक्षाच्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याचा उल्लेख केला आहे. त्यावरून समाजात टीकेचा सूर उमटत आहे. या पार्श्वभूमीवर, ‘लोकमत’ने मान्यवरांची मते जाणून घेतली. 

मुळातच महात्मा फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याची गरज नाही. भारतीय जनतेच्या मनात महात्मा फुले यांचे स्थान अढळ आहे. ‘महात्मा’ हा शब्द ‘भारतरत्न’पेक्षा किती तरी पटींनी मोठा आहे. खुद्द महात्मा गांधी यांनी म्हटले आहे, की फुले हे ख-या अर्थाने  ‘महात्मा’ आहेत. मला लोक प्रेमापोटी ‘महात्मा’ म्हणतात. ‘महात्मा’ ही पदवीच इतकी मोठी आहे त्यापेक्षा दुसरी कोणती पदवी असूच शकत नाही. महात्मा फुले यांना ‘भारतरत्न’ दिले म्हणजे लोकांना आनंद होईल, असे नाही. सावरकरांच्या देशभक्तीबद्दल कुणीच शंका घेत नाही; पण अंदमानामधील काळ हा संशयास्पद आहे. त्यामुळे त्यांना  ‘भारतरत्न’ ही पदवी देणे दुटप्पीपणाचे होईल. जाहीरनाम्यात घोषणा केली असली, तरी कितपत देता येईल, याबाबत साशंकता आहे. 
- संजय सोनवणी, प्रसिद्ध लेखक

भाजपने जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याची घोषणा केली आहे. मात्र, हा निवडणुकीचा विषय असू शकतो का? हाच माझा प्रश्न आहे. ज्या स्थानिक प्रश्नांवर निवडणूक लढवायची, ते प्रश्न बाजूला ठेवून केवळ भावनिकतेच्या बळावर नको ती आश्वासने द्यायची, हा त्यातलाच एक प्रकार आहे.
- डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ कामगार नेते

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा फुले या दोघांना एकाच पातळीवर तोलता येणार नाही. सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी योगदान दिले. पण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण, स्वातंत्र्य, समता या क्षेत्रामध्ये विपुल कार्य केले आहे. महात्मा फुले यांना  ‘भारतरत्न’ फार पूर्वीच द्यायला हवा होता. तो द्यायचादेखील चालले होते; पण का त्याकडे दुर्लक्ष केले गेले कळत नाही? आज निवडणुकीमध्ये राम मंदिरासारखे मुद्दे यायला लागले आहेत. त्यामुळे सावरकर आणि महात्मा फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याचा मुद्दा आणला. त्यात नवीन काही नाही. ‘महात्मा’ ही पदवी सर्वश्रेष्ठ आहेच; पण संविधानात ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब आहे. त्यामुळे महात्मा फुले यांना ‘भारतरत्न’ द्यायला हवे.
- हिराबाई चिपळूणकर

पाच वर्षे केंद्रात आणि राज्यात भाजपचेच सरकार आहे; मग त्यांना महात्मा फुले यांना ‘भारतरत्न’ देण्यापासून कुणी अडवले होते? निवडणूक आल्यानंतरच हे सुचायला लागले का? एकीकडे मागासवर्गीय मुला-मुलींच्या शिक्षणाचा जो निधी आहे त्यात कपात करायची. अनेक मुलांच्या शिष्यवृत्तीदेखील बंद झाल्या आहेत.  त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागत आहे. पुढची पिढी शिकायला नकोय का? एकप्रकारे हा अंतर्विरोध दिसतो आहे. ‘भारतरत्न’ ही मोठी उपाधी आहे. त्याचा मी सन्मान करतो. अनेक मान्यवरांना या उपाधीने सन्मानित केले आहे; पण जोतीराव फुले यांना जी ‘महात्मा’ पदवी मिळाली आहे, ती ‘भारतरत्न’पेक्षाही मोठी आहे. या देशात भ. बुद्ध, गांधीजी आणि फुले यांनाच खºया अर्थाने ‘महात्मा’ म्हटले जाते. आतापर्यंत ५० लोकांना कदाचित ‘भारतरत्न’ मिळाले असेल; पण महात्मा फुले यांना ‘भारतरत्न’ ही उपाधी देऊन त्यांना मोठें करताय की खाली आणताय, याचाही विचार झाला पाहिजे. महात्मा फुले यांच्याबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनाही ‘भारतरत्न’ देण्याचा उल्लेख केला आहे. सावरकरांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी जे योगदान दिले, तुरुंगवास भोगला त्याबद्दल नितांत आदर आहेच; पण सावरकरांची जी विचारसरणी आहे, त्यांनी ज्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराला विरोध केला, अशा वेळी एकाच पातळीवर दोघांना बसवून अशा पद्धतीची मोट का बांधली जात आहे? त्यामुळे ही घोषणा म्हणजे ‘बोलाचीच कढी, बोलाचाच भात’ वाटते. याऐवजी ठोस काहीतरी बोला. 
- प्रा. हरी नरके, ज्येष्ठ विचारवंत

नावाच्या अगोदर किंवा नावानंतर भारतरत्न या किताबाचा उल्लेख संबंधित व्यक्तीला करता येत नाही, असे सर्वोच्च  न्यायालयाचे निर्देश आहेत. ज्यांनी देशाकरिता कार्य केले आहे किंवा  कला, शास्त्र, साहित्य आणि समाजसेवा या क्षेत्रांत अद्वितीय कामगिरी करणा-यास या किताबाने सन्मानित करण्यात येते. कुणाला भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री द्यायचे, याचा निर्णय घेणाºया कॅनिबेटचे प्रमुख पंतप्रधान असतात. त्यांचा निर्णय राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो. 
- प्रा. उल्हास बापट, राज्यघटनेचे अभ्यासक 

Web Title: Mahatma 'title is greater than' Bharat Ratna '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.