‘महावितरण’चा ग्राहकांना झटका
By admin | Published: November 22, 2014 12:17 AM2014-11-22T00:17:22+5:302014-11-22T00:17:22+5:30
पुरंदर तालुक्यात सासवड सब डिव्हिजनअंतर्गत येणाऱ्या शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांना भरमसाठ बिले देऊन महावितरण कंपनीने लोकांना मोठा झटका दिला.
दिवे : पुरंदर तालुक्यात सासवड सब डिव्हिजनअंतर्गत येणाऱ्या शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांना भरमसाठ बिले देऊन महावितरण कंपनीने लोकांना मोठा झटका दिला. त्यामुळे अनेक ग्राहकांचे आलेले वीजबिल पाहून धाबे दणाणले. आपल्याला एवढे बिल कसे आले, अशी विचारणा करण्यासाठी अनेकांनी गेल्या चार दिवसांपासून ‘महावितरण’ कार्यालयात गर्दी केली.
इलेक्ट्रॉनिक मीटर बसविल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून जुन्या मीटरपेक्षा वाढीव रकमेची बिले येत होती. पण, दोन-तीन महिन्यांपासून ग्राहकांना दुप्पट किंवा चौपट बिले येऊ लागली. नवीन मीटरवरचे रीडिंग बरोबर आहे; पण, प्रत्यक्ष वापर कमी आहे, असे वीजग्राहकांचे म्हणणे आहे. अनेकांकडे पाणी गरम करण्यासाठी सौरबंब आहेत. घरगुती विचार केल्यास, सहा बल्ब, एक दूरदर्शन संच, एखादा फ्रिज असा सर्वसाधारण वापर आहे. यासाठी जुन्या मीटरवरील रीडिंगप्रमाणे वापर कमी-जास्त धरून तीनशे ते साडेचारशे वीजबिल येत होते. ते वाढून अकराशे ते सोळाशे रुपयांपर्यंत गेले आहे.
याबाबत उप कार्यकारी अभियंता हितेंद्र भिरूड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मीटरमध्ये काही दोष असल्यास आम्ही ते तपासून पाहू. पण, गेल्या महिन्याचे जास्त बिल लोकांना आले, ते कमी कसे करणार? याबाबत त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हते. ग्राहकांना भुर्दंड भरावा लागत असल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला.
सासवड सब डिव्हिजन अंतर्गत वीजग्राहकांची संख्या घरगुती, शेती, लहान-मोठे कारखाने, व्यापारी वा व्यावसायिक ग्राहक यांची एकूण संख्या चाळीस हजारांच्या आसपास आहे. एवढ्यांचे मीटर महावितरण तपासून कधी दोष घालवणार, हा प्रश्नचिन्ह आहे. (वार्ताहर)