Pune: ‘मविआ’च्या नेत्यांचं सूत जुळल्याने इच्छुकांचं वाढलं टेन्शन; बंडखोरी रोखण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 09:17 AM2023-05-18T09:17:31+5:302023-05-18T09:21:30+5:30
एकाच जागेसाठी मविआतील शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी व कॉंग्रेस इच्छुक असल्याने बंडखोरी रोखण्याचे आव्हान नेत्यांपुढे आहे....
पिंपरी : कर्नाटक निकालामध्ये काँग्रेस पक्षाला यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. लोकसभा आणि विधानसभा एकत्रित लढण्याचा निर्णय घेत राज्य पातळीवर ‘मविआ’ने वज्रमूठ घट्ट करण्यास सुरवात केली. निवडणुका एकत्रित लढण्यासाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या. त्यामुळे मावळ व शिरूर लोकसभा, पिंपरी, चिंचवड, भोसरी व मावळ विधानसभेसाठी मविआतून इच्छुकांचे टेन्शन वाढले आहे. एकाच जागेसाठी मविआतील शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी व कॉंग्रेस इच्छुक असल्याने बंडखोरी रोखण्याचे आव्हान नेत्यांपुढे आहे.
पिंपरी- चिंचवड शहरामध्ये एक मावळ लोकसभा आणि चार विधानसभा मतदारसंघाच्या जागा आहेत. मविआच्या जागावाटपात कोणत्या पक्षाला कोणती लोकसभा व विधानसभेची जागा मिळणार, यावरून अद्याप संभ्रम आहे. त्यामुळे इच्छुकांच्या चिंता वाढल्या आहेत. एका जागेसाठी तिन्ही पक्षातून इच्छुक असल्याने बंडखोरी होऊन त्याचा फायदा भाजपाला होण्याची शक्यताही आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये २०१४ व २०१९च्या विधानसभा निवडणुकीपासून चिंचवड आणि भोसरी हे दोन मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. तर २०१७ च्या महापालिका निवडणुकीमध्येही महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला. मात्र, २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) हे तीन पक्ष एकत्र आले. त्यानंतर जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांच्या एका गटाने भाजपला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले आहे.
दरम्यान, कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर कॉंग्रेसला एकहाती सत्ता मिळाली. त्यामुळे मविआच्या तीनही पक्षांना बूस्टर मिळाला आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांच्या प्रदेश पातळीवर जागा वाटपासाठी बैठका सुरू झाल्याने शहरातील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. पिंपरी चिंचवड शहरातून मावळ व शिरूर लोकसभेसाठी कोणाला संधी मिळणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. तसेच, पिंपरी, चिंचवड, भोसरी व मावळ या चार विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांची कोणाला संधी मिळणार याविषयी उत्सुकता व चिंता वाढली आहे.
मावळ, शिरूर लोकसभेसाठी मविआतून कोण?
मागील पंचवार्षिक निवडणुकीत मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार व शिवसेनेकडून श्रीरंग बारणे यांनी निवडणूक लढवली होती. आता बारणे हे शिवसेना (शिंदे गटा)मध्ये आहेत. तर शिरूरमधून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी पराभव केला होता. आता आढळराव हेदेखील शिंदे गटामधून इच्छुक आहेत. या दोन्ही मतदारसंघापैकी कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटणार, हे अद्याप निश्चित नाही. मात्र, लोकसभेसाठी मविआतून कोण, याविषयी उत्सुकता आहे. त्यामध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे शिरूरमधून माजी मंत्री दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात उतरण्याची चर्चा आहे. दुसरीकडे मावळ लोकसभेसाठी पार्थ पवार आणि सुनील शेळके यांच्यामध्ये रस्सीखेच होण्याची चर्चा आहे.
विधानसभेत बंडखोरी रोखण्याचे आव्हान
काही महिन्यांपूर्वीच चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळी मविआमध्ये बंडखोरी झाली होती. त्यामुळे मविआच्या उमेदवाराला फटका बसला. शहरातील तीन व मावळातील एक या विधानसभेच्या चार जागांपैकी कोणती जागा कोणत्या घटक पक्षाच्या वाट्याला येईल. यावरून खलबते होण्याची शक्यता आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या मतदारसंघांत अपेक्षित जागा न मिळाल्यास मविआमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. ही बंडखोरी रोखणे तिन्ही पक्षाच्या नेत्यांसमोर मोठे आव्हान असेल.
लोकसभा मतदारसंघ - खासदार - पक्ष
मावळ - श्रीरंग बारणे - शिवसेना (शिंदे गट)
शिरूर - डॉ. अमोल कोल्हे - राष्ट्रवादी काँग्रेस
विधानसभा
मतदारसंघ - आमदार - पक्ष
पिंपरी - अण्णा बनसोडे - राष्ट्रवादी काँग्रेस
चिंचवड - अश्विनी जगताप - भाजप
भोसरी - महेश लांडगे - भाजप
मावळ - सुनील शेळके - राष्ट्रवादी काँग्रेस