वडगाव कांदळीत महाविकास आघाडीचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:10 AM2021-01-21T04:10:18+5:302021-01-21T04:10:18+5:30
वडगाव कांदळी महाविकास आघाडी व बिरोबा महाराज ग्रामविकास पॅनल या दोन पॅनलमध्ये अटीतटीची व चुरशीची लढत झाली होती. अतिशय ...
वडगाव कांदळी महाविकास आघाडी व बिरोबा महाराज ग्रामविकास पॅनल या दोन पॅनलमध्ये अटीतटीची व चुरशीची लढत झाली होती. अतिशय चुरशीची समजली जाणारी ही लढत एकतर्फी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
संजय खेडकर, प्रा.श्रीकांत पाचपुते व रामदास पवार यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या महाविकास आघाडी पॅनलला मतदारांनी कौल दिल्याचे पाहावयास मिळाले, तर सचिन निलख यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या बिरोबा महाराज ग्रामविकास पॅनलला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले. ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने केलेली सर्वपक्षीय आघाडी या निवडणुकीत निर्णायक ठरली. विकासाचे ध्येय समोर ठेवून मतदारांपर्यंत गेल्याने मतदारांनी महाविकास आघाडीला कौल दिल्याचे दिसून येत आहे. वार्ड क्रमांक १, २ व ३ या तिन्ही वार्डांमध्ये महाविकास आघाडीने संपूर्ण आठही जागा जिंकल्या, तर वार्ड क्रमांक चारच्या तीनही जागा बिरोबा महाराज ग्रामविकास पॅनलने जिंकल्या.
वार्डनिहाय निवडून आलेले उमेदवार व त्यांची मते :
वार्ड क्रमांक १- रामदास पवार यांना ४९० मते, सुवर्णा मुटके यांना ४४९ मते तर संगीता भोर यांना ४०६ मते मिळाली. वार्ड क्रमांक २ मध्ये उल्का पाचपुते यांना ४२५ मते, संजय खेडकर यांना ३३३ मते मिळाली, तर जिजाभाऊ भोर यांना ३३८ मते मिळाली. वार्ड क्रमांक ३ मध्ये पंढरीनाथ पाचपुते यांना ३०२ मते मिळाली. शाहिदा पठाण ३११ मते मिळून विजयी झाल्या. या तीनही प्रभागांमध्ये वडगाव कांदळी महाविकास आघाडीचे संपूर्ण ८ उमेदवार निवडून आले, तर वार्ड क्रमांक ४ मध्ये बिरोबा महाराज ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व राहिले. यामध्ये सचिन निलख यांना ३३३ मते मिळाली. शुभांगी निलख यांना ३०५ मते मिळाली, तर सुजाता लांडगे यांना ३१७ मते मिळाली. यावेळी बोलताना प्रा.श्रीकांत पाचपुते यांनी सांगितले की, या विजयाने आम्ही हुरळून न जाता गावच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहू मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करू, असे सांगितले.
वडगाव कांदळी (ता.जुन्नर)येथील महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार दिसत आहेत.