'मविआ' सरकारने शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत करावा, हर्षवर्धन पाटलांची राज्यपालांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 01:36 PM2021-11-26T13:36:14+5:302021-11-26T14:05:42+5:30
राज्यात मागील १० दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीज पुरवठा पुर्णपणे बंद केला आहे. परिणामी, शेती पिके जळून चालली आहेत. पाण्याअभावी पशुधन अडचणीत आले आहे
बारामती : राज्यात मागील १० दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीज पुरवठा पुर्णपणे बंद केला आहे. परिणामी, शेती पिके जळून चालली आहेत. पाण्याअभावी पशुधन अडचणीत आले आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वीज तोडणी प्रश्नी लक्ष घालावे, अशी विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. मुंबईत राजभवनावरती पाटील यांनी राज्यपाल कोश्यारी यांची गुरुवारी भेट घेतली.
महावितरण वीज बिल थकबाकी वसुलीसाठी वीज पुरवठा पूर्णपणे बंद केल्याने जनावरांना पाणी मिळत नाही, उभी पिके करपून चालली आहेत, रब्बी पिकांच्या पेरण्या बंद पडल्या आहेत, त्यामुळे शेतकरी आक्रमक होऊन ठीक ठिकाणी आंदोलन करीत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले.
वीज पुरवठा तात्काळ पूर्ववतपणे चालू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा
शेतकरी वर्ग अद्यापी कोरोना तसेच राज्यात झालेल्या अतिवृष्टीने आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. अशाप्रकारे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सहकार्य करणे शासनाचे कर्तव्य आहे. मात्र शेतीपंपांचा वीज पुरवठा खंडित करून शेतकरी वर्गाला वेठीस धरण्याचे काम शासनाकडून चालू आहे. शेतकऱ्यांची सध्याची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारने शेतीपंपांचा वीज पुरवठा तात्काळ पूर्ववतपणे चालू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी भेटीत त्यांनी राज्यपालांकडे केली. शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नी राज्यपाल महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यातील विविध समस्यांवरती अभ्यास असून, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा राज्याला होत आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.