Harshvardhan Patil: एसटी महामंडळाच्या बिकट परिस्थितीला महाविकास आघाडी सरकारचं जबाबदार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 03:01 PM2021-11-07T15:01:05+5:302021-11-07T15:01:12+5:30
(ST Strike) राज्यातील महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचारी संघटनेच्या मागण्या तात्काळ मान्य करून तोडगा काढावा
बारामती : एसटी महामंडळाचे (St Mahamandal) राज्य शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसह एसटी कर्मचारी संघटनेने केलेल्या इतर मागण्या रास्त आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचारी संघटनेच्या मागण्या तात्काळ मान्य करून तोडगा काढावा. एसटी महामंडळाच्या सध्याच्या बिकट परिस्थितीला राज्य शासन जबाबदार असल्याची टीका भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी राज्य सरकारवर केली आहे.
इंदापूर एसटी आगार येथे रविवारी हर्षवर्धन पाटील यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांना पाठिंबा व्यक्त केला. इंदापूर येथील एसटीचे कर्मचारी दि.४ नोव्हेंबर पासून आपल्या मागण्यासाठी संपावर गेले आहेत. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन हर्षवर्धन पाटील यांना सादर केले.
यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या सोडवण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे प्रयत्नशील आहेत. एसटी कर्मचारी हे राज्यातील जनतेची अहोरात्र सेवा करीत आहेत. कोरोना काळात सेवा बजावत असताना राज्यातील शेकडो एसटी कर्मचाऱ्यांचे निधन झाले. राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे आर्थिक कुचंबणा होऊ लागल्याने एसटीच्या सुमारे ३५ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. एसटी महामंडळाच्या सध्याच्या बिकट परिस्थितीला राज्य शासन जबाबदार असल्याचा, आरोप यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी केला. आपल्या रास्त मागण्या मान्य होईपर्यंत संप (ST Strike) चालूच राहील असा निर्धार यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.