Harshvardhan Patil: हे तर शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणारे सरकार; शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करून दिला जातोय त्रास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 04:28 PM2021-11-23T16:28:28+5:302021-11-23T16:28:35+5:30
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. अशाप्रकारे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सहकार्य करणे व आधार देणे हे शासनाने कर्तव्य असताना, उलटपणे शेतीपंपांचा वीज पुरवठा खंडित करून त्रास दिला जात आहे.
बारामती : शेतकरी वर्ग अद्यापी कोरोना तसेच मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. अशाप्रकारे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सहकार्य करणे व आधार देणे हे शासनाने कर्तव्य असताना, उलटपणे शेतीपंपांचा वीज पुरवठा खंडित करून त्रास दिला जात आहे. शासनाने शेतकऱ्यांना वेठीस धरणे बंद करून तात्काळ शेतीपंपांचा वीज पुरवठा पूर्ववतपणे चालू करावा, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी केली. तर वीज बिल माफ करावे अशी मागणी करणारेच सध्या सत्तेवर आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) हे शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या सध्याच्या अडचणीच्या परिस्थितीचा विचार करून वीज तोडणी मोहीम तत्काळ थांबवावी असेही ते म्हणाले आहेत.
''महावितरणने सध्या शेतीपंपांचा वीज पुरवठा वीज थकबाकी वसुलीसाठी खंडित केला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला असून शेतातील उभी पिके पाण्याअभावी करपून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय रब्बी पिकांची पेरणी तसेच ऊस पिकाच्या लागवडीस चालू आहेत. सध्या महावितरणकडून जनावरांना व माणसांना पिण्याच्या पिण्यासाठी दररोज वीजपुरवठा तासभर देखील चालू ठेवला जात नसल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे पशुधनही अडचणीत आले आहे. शेतकऱ्यांना अशा प्रकारे वेठीस धरणे योग्य नसल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.''
''हर्षवर्धन पाटील यांची शेतकऱ्यांनी भेट घेऊन शेतीपंपांचा वीजपुरवठा चालु करण्यात यावा, अशी मागणी केली. यासंदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी एमएसईबीच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. सध्याच्या अडचणीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक असल्याने वीज तोडणी मोहीम तत्काळ थांबवावी व खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत सुरु करावा, अशी मागणी त्यांनी केली.''