PMC Election | आम्हाला तर स्वबळावरच लढायचंय! महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 04:15 PM2022-05-28T16:15:00+5:302022-05-28T16:15:01+5:30

आदेश आला तर महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणुकीला सामाेरे जाऊ....

Mahavikas Aghadi leaders face pmc election own bjp congress shivsena ncp mns | PMC Election | आम्हाला तर स्वबळावरच लढायचंय! महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भावना

PMC Election | आम्हाला तर स्वबळावरच लढायचंय! महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भावना

Next

नीलेश राऊत

पुणे : महापालिकेची आगामी निवडणूक आम्हाला स्वबळावरच लढायची आहे. आमचे कार्यकर्ते प्रत्येक प्रभागात सक्षम असून, आमच्याकडेही तुल्यबळ उमेदवार आहेत. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी केली आहे; पण पक्षाच्या वरिष्ठांनी भाजपला रोखण्यासाठी पुण्यातही महाविकास आघाडी करण्याचा निर्णय घेतला तरच आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणुकीला सामाेरे जाऊ, अशी भूमिका पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेने घेतली आहे. या तिन्ही पक्षांच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे प्रत्येक प्रभागात इच्छुक निवडणूक रणनीती आखत आहेत. मात्र, यदाकदाचित महाविकास आघाडी झाली तर या तिन्ही पक्षांना बंडखोरीचे मोठे ग्रहण लागणार, हे निश्चित आहे.

महापालिका निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणार असल्याने सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मुंबईत महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यासाठी तिन्ही पक्षांची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली असता, त्यांनी स्वबळाचाच नारा दिला आहे.

महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमुळे महापालिका निवडणुकीचे यंदा चित्र बदलले आहे. उपनगरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आम्ही सर्वाधिक ताकदवर असल्याचा दावा केला आहे. महापालिकेतील प्रमुख विराेधी पक्ष म्हणून काम करणाऱ्या राष्ट्रवादीने पहिल्यापासूनच ५८ प्रभागांमध्ये सर्वाधिक जागांचा दावा केला आहे. यामुळे काही वर्षांपूर्वी महापालिकेत एकहाती राज्य करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीबाबत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तर शिवसेनेलाही आघाडीतील जागा वाटपात आपल्या पदरात कितपत न्याय मिळणार, याबाबत अनिश्चितता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीत आमचेच पारडे जड राहणार, असा दावा केल्याने तिन्ही पक्ष पुणे शहरात ‘एकलाच चलो रे’चा आग्रह धरत आहे.

पक्षनिष्ठा जोपासली जाणार का ?

निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेची आघाडी न झाल्यास त्याचा मोठा फायदा भाजपला होण्याची दाट शक्यता आहे. हे तिन्ही पक्ष स्वतंत्र लढल्यास त्यांच्या मतांची विभागणी होऊन भाजपच्या उमेदवाराला विजयाची वाट सुकर होणार असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर भाजपला सत्तेपासून राेखण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून सामोरे जाऊ, अशी दुहेरी भूमिकाही महाविकास आघाडीतील पक्षांनी घेतली आहे; परंतु आघाडी झाली तर प्रत्येक पक्षातील नाराज उमेदवारी वाटपाच्या आदल्या दिवशी किती पक्षनिष्ठा जोपसणार, हा मोठा कळीचा मुद्दा आहे.

Web Title: Mahavikas Aghadi leaders face pmc election own bjp congress shivsena ncp mns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.