मविआने ४८ जागा आपापसांत घ्याव्यात, आम्हाला ज्या जागा हव्या त्या आम्ही घेऊ : वंचित बहुजन आघाडी
By भाग्यश्री गिलडा | Published: January 25, 2024 03:27 PM2024-01-25T15:27:34+5:302024-01-25T15:28:39+5:30
आम्हाला महाविकास आघाडीसोबत जायचे आहे. परंतु महाविकास आघाडी कोणत्याच चर्चेला किंवा बैठकांना आम्हाला बोलावत नाही....
पुणे : लोकसभा निवडणुकीची तयारी आम्ही करत आहोत. आम्हाला महाविकास आघाडीसोबतच जायचे आहे मात्र महाविकास आघाडीने ४८ जागांचे आपापसांत करून घ्यावे, त्यानुसार आम्हाला पुढील दिशा ठरवता येईल असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते प्रियदर्शी तेलंग यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, "आम्हाला केंद्रात आणि राज्यात आरएसएस, बीजेपीचे सरकार येऊ द्यायचे नाही हे आमचे धोरण आहे. त्यामुळे गठबंधनातून बाहेर पडण्याचा आमचा काही विचार नाही. आम्हाला महाविकास आघाडीसोबत जायचे आहे. परंतु महाविकास आघाडी कोणत्याच चर्चेला किंवा बैठकांना आम्हाला बोलावत नाही. त्यामुळे त्यांनी ४८ जागा आपसांत वाटून घ्याव्यात त्यानंतर आम्हाला ज्या जागा लढवायच्या आहेत त्या आम्ही घेऊ."
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आम्ही वंचित बहुजन आघाडी यांना सोबत घेऊन पुढील वाटचाल करू असे सांगितले पण दुसऱ्या बाजूला निवडणूक नंतर आम्ही निर्णय घेऊ असे ते सांगत असतात. आम्ही इंडिया आघाडी मध्ये जाण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आघाडी मध्ये समसमान जागा वाटप करून आम्हला १२ जागा निवडणूक लढण्यास देण्यात यावा असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते एडवोकेट प्रियदर्शी तेलंग यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केले.
पुढे बोलताना तेलंग म्हणाले, नितीश कुमार यांनी इंडिया आघाडी होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अनेक पक्ष त्यात सहभागी झाले असून आम्ही महाविकास आघाडीला सोबत जाण्यास तयार आहे. भाजप आणि संघ प्रणित सरकार केंद्र आणि राज्यातून हद्दपार करण्यासाठी आम्ही आघाडीत जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. आम्ही किती जागा लढवण्याची आहे हे वाटाघटीचा भाग आहे. महाविकास आघाडी मध्ये आम्हाला घेतले गेले नाही तर आम्ही आगामी निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी करू. आमचे धोरण महाविकास आघाडी सोबत जाण्याचे आहे मात्र, त्यांनी आम्हाला खेळवत ठेवले तर आम्ही पुढची तयारी करु. तीन पक्ष आम्हला सोबत घेण्याचे सांगत आहे पण प्रत्यक्ष अंमलबजावणी करत नाही. काँग्रेस पक्षाला आमच्याबद्दल काही अडचण असेल तर त्यांनी त्याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. यावेळी फारुख अहमद, प्रा. सोमनाथ साळुंके, प्रफुल्ल गुजर, गौरव जाधव, सुनील धेंडे उपस्थित होते.