भाजप सरकारने फोडाफोडीचे राजकारण केले; काँग्रेस प्रवक्त्या डॉ. शमा मोहंमद यांची टीका
By नितीन चौधरी | Published: November 19, 2024 02:35 PM2024-11-19T14:35:29+5:302024-11-19T14:36:59+5:30
काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहंमद यांची टीका
पुणे : भाजपचे नेते घुसखोरी, एक है तो सेफ है, कटेंगे तो बटेंगे... अशी दुहीची भाषा करत आहेत. विकास काय केला ते सांगत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे वादळ येत असून पुणे जिल्ह्यात चांगले यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहंमद यांनी व्यक्त केला. भाजप सरकारने फोडाफोडीचे राजकारण केले आहे. त्यामुळेच हा रोष मतदानातून दिसून येईल, असेही त्या म्हणाल्या.
शमा गेले १५ दिवस पुण्यात तळ ठोकून आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “भाजपने २०१४ मध्ये न्यू इंडियाचे स्वप्न दाखविले. त्यानंतर विकसित भारत, अमृतकाळ अशा खोट्या वल्गना केल्या. हा अमृतकाळ कोठे आहे? कर्नाटक व केरळमध्ये भाजप हरत असताना दुहीच्या राजकारणाची भाषा करण्यात आली. हीच स्थिती आता महाराष्ट्रात आहे. पुण्यात राज्य सरकार विरोधात प्रचंड रोष आहे. वाहतूक समस्या, आयटीतील गुंतवूणक, रोजगार बाहेर जात आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये निराशा आहे. महिला सुरक्षित नाहीत. शेतकऱ्यांचेही प्रश्न आहेत. शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे मागे पडत आहे.”
भाजप सरकारने फोडाफोडीचे राजकारण केले आहे. त्यामुळेच हा रोष मतदानातून दिसून येईल. त्यामुळेच आघाडीला जिल्ह्यात चांगले यश मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला होणार नाही, असा दावा करत शमा यांनी ही योजना निवडणुकीच्या काळातील मतदारांना दिलेली लाच असल्याची टीका केली. मतदारांना जीएसटी, पेट्रोल-डिझेल यातून पैसा काढून ही योजना राबविली जात असल्याचे कळले आहे. त्यामुळे ही योजना चालणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
आघाडीनेही महिलांना ३ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. ते कसे पूर्ण केले जाईल याविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, “काँग्रेसशासित राज्यांमध्ये ही योजना सुरू आहे. त्याचे नीटपणे नियोजन केले आहे. काँग्रेसने पूर्वी अन्नसुरक्षा कायदा, मनेरगा अशा योजना यशस्वीपणे राबविल्या. त्यामुळे ३ हजार रुपयांची योजनाही राबविली जाईल.” भाजप सरकारच्या काळात २० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दाखला देत हे सरकार सोयाबीनला हमी भाव देणार होते. कोठे गेला हा हमीभाव? हे सरकार खोटारडे सरकार असल्याची टीका त्यांनी केली.
भाजपने केवळ दोन उद्योगपतींसाठीच काम केले आहे. त्यांच्याजवळ देशातील एकूण संपत्तीपैकी ६० टक्के संपत्ती आहे. त्यामुळे कॉर्पोरेट कर ३० टक्क्यांवरून २० टक्के करण्यात आला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. आघाडीने दिलेल्या पाच आश्वासनांमधून जातीनिहाय जनगणना, आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त करणे यातून मतदार आघाडीकडे वळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.