Mahavikas Aghadi: 'मविआ' ला लोकसभेत यश; विधानसभेच्या रणनितीला सुरुवात, १६ ऑगस्टला मुंबईत महामेळावा

By राजू इनामदार | Published: August 6, 2024 06:29 PM2024-08-06T18:29:57+5:302024-08-06T18:35:46+5:30

विधानसभा निवडणुकीसंबधीच्या प्रचाराची दिशा व अन्य महत्वाच्या गोष्टींबाबत मेळाव्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार

mahavikas aghadi success in lok sabha Legislative Assembly strategy begins August 16 meeting in Mumbai | Mahavikas Aghadi: 'मविआ' ला लोकसभेत यश; विधानसभेच्या रणनितीला सुरुवात, १६ ऑगस्टला मुंबईत महामेळावा

Mahavikas Aghadi: 'मविआ' ला लोकसभेत यश; विधानसभेच्या रणनितीला सुरुवात, १६ ऑगस्टला मुंबईत महामेळावा

पुणे: लोकसभा निवडणुकीतील यशाने आत्मविश्वास दुणावलेल्या महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) १६ ऑगस्टला मुंबईत राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या महामेळाव्याचे आयोजन केले आहे. विधानसभा निवडणुकीसंबधीच्या (Vidhan Sabha Election) प्रचाराची दिशा व अन्य महत्वाच्या गोष्टींबाबत मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शऱद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार(Sharad Pawar), शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधणार आहेत. तीनही पक्षांच्या राज्यातील सर्व जिल्हे व शहरांमधील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मेळाव्यासाठी बोलावण्यात आले आहे. नेते त्यांच्याकडून माहिती, सुचना घेतील, चर्चा करतील व त्यानुसार आघाडीसाठी प्रचाराची दिशा व धोरण ठरवण्यात येईल अशी माहिती काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्याने दिली.

लोकसभा निवडणुकीत आघाडीला चांगले यश मिळाले. या निवडणुकीआधीही आघाडीचा असाच एक मेळावा झाला होता. त्यात ठरवण्यात आल्याप्रमाणेच संपूर्ण लोकसभा निवडणुकीचा प्रचार झाला. भारतीय जनता पक्ष व महायुतीला त्यामुळे बॅकफूटवर जावे लागले. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीपूर्वी जाणीवपूर्वक हा मेळावा होत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सांगण्यानुसार मेळाव्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मिळाली.

आघाडीला लोकसभेत मित्रपक्षांकडूनही चांगली साथ मिळाली. विशेषत: आघाडीत सामील झालेल्या आम आदमी पार्टी या पक्षासह विविध संस्था, संघटनाही लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या बाजूने प्रचारात सक्रिय झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनाही या महामेळाव्यासाठी बोलावण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच जाहीर होणे अपेक्षित आहे. त्यामुळे आघाडीमध्ये लोकसभेप्रमाणेच एकवाक्यता निर्माण व्हावी यासाठी असा मेळावा घेण्याचा नेत्यांचा विचार आहे. त्याचे नियोजन सुरू आहे. मेळावा मुंबईत घ्यायचा हे निश्चित झाले तरी अद्याप ठिकाण ठरलेले नाही.- अंकूश काकडे- राज्य प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

Web Title: mahavikas aghadi success in lok sabha Legislative Assembly strategy begins August 16 meeting in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.