Pune: पर्वती, शिवाजीनगर, कसब्यात 'मविआ' ची डोकेदुखी अन् बंडखोरी कायम; महायुतीला फायदा?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 04:30 PM2024-11-04T16:30:13+5:302024-11-04T16:31:26+5:30
काँग्रेस पक्षाकडून बंडखोरांवर कारवाई होईलच पण त्यांना पुन्हा पक्षात घेणार नसल्याचा ठराव केला जाणार
पुणे : पुण्याच्या पर्वती, शिवाजीनगर आणि कसबा विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे. आगामी विधानसभेत पुण्यात महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली असून या बंडखोरीचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेवटच्या क्षणापर्यंत नेत्यांची मनधरणी केली जात होती. मात्र काहींनी माघार न घेता निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. पुण्यातही आता मागील निवडणुकीप्रमाणे महायुतीचे ८ आमदार निवडून येणार का? याबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत.
पर्वती विधानसभा
पर्वती विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अश्विनी कदम, महायुतीकडून भाजपच्या माधुरी मिसाळ आणि अपक्ष म्हणून काँग्रेसचे आबा बागुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीमध्ये पर्वती मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आलेला आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, यासाठी आबा बागुल प्रयत्नशील होते. पण, पर्वतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अश्विनी कदम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आबा बागुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आज शेवटच्या क्षणापर्यंत बागुल निवडणूक लढवण्यावर ठाम होते. अखेर त्यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे. आता पर्वतीत तिरंगी लढत होणार असून त्याचा फायदा मात्र महायुतीला होण्याची शक्यता वाढली आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे सचिन तावरे यांनीसुद्धा बंडखोरी केली होती. त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विनंतीला मान देऊन अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला, परंतु वेळेमध्ये ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. ३ मिनिटांचा उशीर झाला, त्यामुळे त्यांचा अर्ज माघार होऊ शकला नाही, पण सचिन तावरे यांचा महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांना पाठिंबा दिल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अंकुश काकडे यांनी सांगितले आहे.
कसबा विधानसभा
कसबा विधानसभेच्या मैदानात मनसे उतरल्याने तिरंगी लढत होणार आहे. मात्र शहराच्या प्रथम महिला महापौर असलेल्या कमल व्यवहारे यांनी बंडखोरी जाहीर केल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी कायम राहिली आहे. परंतु कमल व्यवहारे अपक्ष अर्ज भरल्यानंतर त्यांची बंडखोरी काँग्रेसने फारशी गंभीरपणे घेतलेली दिसत नाहीये. उलट मनसे मैदानात आल्याने महायुती आणि महाविकास आघाडीची धाकधूक वाढली आहे. पण व्यवहारे यांची बंडखोरी काँग्रेसला धक्का देणार का? असे सवालही उपस्थित होऊ लागले आहेत. त्यामुळे महायुतीला फायदा होण्याची शक्यता दिसते आहे.
शिवाजीनगर विधानसभा
शिवाजीनगर विधानसभेतून काँग्रेसचे मनीष आनंद यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे. या बंडखोरीकडे काँग्रेसने दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. मनीष आनंद यांची कोणत्याही वरिष्ठ नेत्याने मनधरणी केली नाही. त्याचा किती परिणाम होईल याची काँग्रेस कार्यकर्त्यांनाच शंका असल्याने काँग्रेसही निवांत असल्याचे शिवाजीनगरमध्ये दिसून आले आहे. आगामी विधानसभेत शिवाजीनगरमध्ये महायुतीचे सिद्धार्थ शिरोळे आणि महाविकास आघाडीचे दत्ता बहिरट यांच्यात प्रमुख लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बंडखोरांना पक्षात घेणार नाही
पक्षाकडून बंडखोरांवर कारवाई होईलच. पण महापालिकेच्या आगामी निवडणूकीत महाविकास आघाडीतील तीनही पक्ष बंडखोर किंवा त्यांच्याबरोबर राहिलेले पदाधिकारी यांना उमेदवारी देणार नाही. पक्षात घेणार नाही. असा ठराव करणार. - अरविंद शिंदे, शहराध्यक्ष काँग्रेस.