MAHAVITARAN ABHAY YOJNA : महावितरण अभय योजनेला अत्यल्प प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 12:58 IST2025-02-16T12:57:45+5:302025-02-16T12:58:44+5:30

७६२ कोटींच्या थकबाकीपैकी केवळ ४३ कोटींची वसुली, ३१ मार्चअखेरची मुदत

MAHAVITARAN ABHAY YOJNA Very little response to Mahavitaran Abhay Yojana | MAHAVITARAN ABHAY YOJNA : महावितरण अभय योजनेला अत्यल्प प्रतिसाद

MAHAVITARAN ABHAY YOJNA : महावितरण अभय योजनेला अत्यल्प प्रतिसाद

पुणे : महावितरणच्या अभय योजनेत पुणे विभागात सुमारे सव्वासहा लाख अकृषक ग्राहकांकडील ७६२ कोटी मूळ थकबाकीपैकी केवळ ४३ कोटी रुपये वसूल झाले आहेत. ही वसुली मूळ थकबाकीच्या सुमारे ६ टक्केच आहे. त्यामुळे या योजनेकडे थकबाकीदार ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. ही योजना आता ३१ मार्चपर्यंतच सुरू राहील, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतरही नवीन जागामालक किंवा ताबेदारांना जागा वापरासह विजेची गरज असो किंवा नसो, थकबाकीची रक्कम भरावी लागणार आहे.

महावितरणने गेल्या सप्टेंबरमध्ये अभय योजना जाहीर केली होती. त्यात थकबाकीमुळे ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या तसेच कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित सर्व अकृषक वीज ग्राहकांसाठी ही योजना लागू होती. त्यावेळी विभागातील ६ लाख २९ हजार ८३ अकृषक ग्राहकांकडे ९०१ कोटी ९७ लाख रुपयांची एकूण थकबाकी होती. यातील मूळ थकबाकी ७६२ कोटी १९ लाख रुपये होती. या थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण व्याज व विलंब आकाराचे १३९ कोटी ७८ लाख रुपये माफ होणार होते. मात्र, या योजनेकडे थकबाकीदार ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. पुणे विभागामध्ये आतापर्यंत ३३ हजार ३०४ ग्राहकांनी अर्ज केले आहे. २९ हजार ५०१ ग्राहक सहभागी झाले आहेत. त्यापैकी १७ हजार २६१ वीजग्राहकांनी विजेची गरज नसल्याने योजनेचा लाभ घेऊन थकबाकीतून मुक्ती मिळविली आहे. तर १० हजार १३५ वीज ग्राहकांकडे विजेची पुनर्जोडणी करण्यात आली असून, ५ हजार ९०८ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे.

योजनेत सहभागी झालेल्या या २९ हजार ५०१ थकबाकीदारांनी ४३ कोटी ११ लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे. यात पुणे जिल्ह्यात १२ हजार ९६ ग्राहकांनी २७ कोटी ५६ लाख, सातारा जिल्ह्यात १ हजार ६६७ ग्राहकांनी २ कोटी ९ लाख, सोलापूर जिल्ह्यात ४ हजार ७१९ ग्राहकांनी ४ कोटी २ लाख, कोल्हापूर जिल्ह्यात ६ हजार ४५३ ग्राहकांनी ६ कोटी ३६ लाख आणि सांगली जिल्ह्यातील ४ हजार ५६६ ग्राहकांनी ३ कोटी ८ लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे.

थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण १०० टक्के व्याज व विलंब आकाराची (दंड) रक्कम माफ होत आहे. तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के, तर उच्चदाब ग्राहकांना आणखी ५ टक्के सूट मिळत आहे. यासोबतच मूळ थकबाकीची सुरुवातीला ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याचीदेखील सोय आहे. ही योजना ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी केले आहे.

Web Title: MAHAVITARAN ABHAY YOJNA Very little response to Mahavitaran Abhay Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.