पुणेकरांवर महावितरणकडून कारवाईचा बडगा; २५ हजारांवर थकबाकीदारांची वीज खंडित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 16:45 IST2025-03-26T16:44:13+5:302025-03-26T16:45:10+5:30
थकीत वीजबिलांचा ताबडतोब भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे

पुणेकरांवर महावितरणकडून कारवाईचा बडगा; २५ हजारांवर थकबाकीदारांची वीज खंडित
पुणे: पुण्यात महावितरणकडून तब्बल २५ हजार ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ग्राहकांनी थकीत वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे पुणे परिमंडलामध्ये गेल्या २४ दिवसांत २५ हजार ४३४ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सद्यस्थितीत घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे अद्यापही ८८ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे. थकीत वीजबिलांचा ताबडतोब भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
पुणे शहरात ४० कोटींची थकबाकी
पुणे शहरात एकूण घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे ४० कोटी ९ लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या २४ दिवसांमध्ये १० हजार १७७ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
पिंपरी चिंचवडमध्ये १८ कोटींची थकबाकी
पिंपरी चिंचवड शहरात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे १८ कोटी ४० लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यातील ७ हजार ७९६ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
पुणे ग्रामीणमध्ये २९ कोटींची थकबाकी
ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, राजगड, हवेली तालुक्यांमध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे २९ कोटी ९६ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यातील ७ हजार ४६१ ग्राहकांचा वीजपुरवठा गेल्या २४ दिवसांत खंडित करण्यात आला.
थकबाकीचा त्वरीत भरणा करावा
महावितरणची संपूर्ण आर्थिक मदार ग्राहकांकडील वीजबिलांच्या दरमहा वसूलीवरच आहे. वीजबिलांच्या वसूलीमधूनच वीजखरेदीसह विविध देणी दरमहा द्यावी लागतात. त्यामुळे थकीत वीजबिलांच्या वसूलीला मोठा वेग देण्यात आला आहे. वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.