महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण
By admin | Published: December 12, 2015 12:38 AM2015-12-12T00:38:53+5:302015-12-12T00:38:53+5:30
वीजबिल थकबाकीची रक्कम भरण्याची लोकअदालतीची नोटीस का दिली, या कारणावरून महावितरण कंपनीच्या कनिष्ठ तंत्रज्ञ कर्मचाऱ्याला धमकी देऊन बेदम मारहाण
इंदापूर : वीजबिल थकबाकीची रक्कम भरण्याची लोकअदालतीची नोटीस का दिली, या कारणावरून महावितरण कंपनीच्या कनिष्ठ तंत्रज्ञ कर्मचाऱ्याला धमकी देऊन बेदम मारहाण करण्यात आली. शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून तालुक्यातील शेटफळ हवेलीमधील दोघांवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामभाऊ बाबूराव मोरे व शारदा रामभाऊ मोरे (रा. शेटफळ हवेली) अशी आरोपींची नावे आहेत. कनिष्ठ तंत्रज्ञ संजय प्रल्हाद म्हेत्रे (रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.
६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता आवारे यांना थकबाकीची नोटीस बजावण्यासाठी म्हेत्रे त्यांच्या घरी गेले होते. घर बंद असल्याने नोटीस दाराच्या कडीला लावून ते परतले. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता ते गावातील एका ठिकाणची सर्व्हिस वायर बदलण्याचे काम करीत असताना आरोपींनी तेथे येऊन ‘तू माझ्या घराला नोटीस का दिली?’ असे म्हणत लोकांसमोर म्हेत्रे यांना शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली. या संदर्भात म्हेत्रे यांनी त्या दिवशी त्या दोघांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.