महावितरणच्या सिंगल फेज वीजजोडणीत भ्रष्टाचार?
By admin | Published: June 14, 2014 02:14 AM2014-06-14T02:14:30+5:302014-06-14T02:14:30+5:30
बेलसर (ता. पुरंदर) येथे महावितरणकडून सिंगल फेज तसेच पथदिव्यांची कामे सुरू आहेत. काही पूर्ण झाली आहेत.
जेजुरी : बेलसर (ता. पुरंदर) येथे महावितरणकडून सिंगल फेज तसेच पथदिव्यांची कामे सुरू आहेत. काही पूर्ण झाली आहेत. या कामात सरपंच, माजी सरपंच व ग्रामसेवक यांनी महावितरणच्या ठेकेदार व अधिकाऱ्यांशी संगनमत करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप उपसरपंच दीपाली गरुड, सदस्य धीरज जगताप आदी ५ सदस्यांनी केला.
या संदर्भात महावितरणचे जेजुरी ग्रामीणचे शाखा अभियंता आनंद पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘बेलसर येथील सिंगल फेजिंगचे काम सध्या बंद आहे. काही ठिकाणी शेतकरी अडथळे निर्माण करीत आहेत; मात्र सर्व वाड्या-वस्त्यांना सिंगल फेज होणार आहे. तर पथदिव्यांसंबंधी ग्रामपंचायतीच्या सूचनेनुसारच पोल उभारण्यात आल्याचे’ सांगितले.
बेलसर ग्रामपंचायतीचे ग्रमसेवक एम. आर. कादबाने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
सिंगल फेजिंग व पथदिव्यांसाठी आलेल्या ५३ पोलमधील २१ पोल पदाधिकाऱ्यांनी व त्यांच्या नातेवाइकांनीच लाटल्याचा आरोप उपसरपंच दीपाली गरुड, धीरज जगताप, विजया जगताप, संजय जगताप, पल्लवी जगताप आदींनी केला आहे.