Pune Vidhan Sabha 2024: महायुती की महाविकास आघाडी! २१ आमदारांचे भवितव्य ८७ लाख पुणेकरांच्या हातात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 12:59 PM2024-10-16T12:59:03+5:302024-10-16T13:00:11+5:30

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदार चिंचवड विधानसभा मतदार संघात तर सर्वात कमी बहुचर्चित अशा कसबा विधानसभा मतदार संघात

Mahayuti or Mahavikas Aghadi The fate of 21 MLAs is in the hands of 87 lakh Pune residents | Pune Vidhan Sabha 2024: महायुती की महाविकास आघाडी! २१ आमदारांचे भवितव्य ८७ लाख पुणेकरांच्या हातात

Pune Vidhan Sabha 2024: महायुती की महाविकास आघाडी! २१ आमदारांचे भवितव्य ८७ लाख पुणेकरांच्या हातात

पुणे : राज्यात भौगोलिकदृष्ट्या दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा असलेल्या पुण्यात राज्यातील सर्वाधिक मतदार आहेत. येत्या २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ८७ लाख ५७ हजार ४२६ मतदार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. यासाठी जिल्ह्यात ८ हजार ४१७ मतदान केंद्रे उभारली जाणार असून, तब्बल ३२ हजार ईव्हीएम अर्थात मतदान यंत्रांचा वापर केला जाणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी पोलिसांसह सुमारे ७४ हजारांहून अधिक मतदान अधिकारी व कर्मचारी तैनात केले आहेत. शहरी भागात मतदान कमी होत असल्याने जिल्ह्यातील तब्बल १२७ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत, अशी माहितीही डाॅ. दिवसे यांनी दिली.

नवमतदार १ लाख ६५ हजार

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठीची प्रक्रिया अर्थात आचारसंहिता लागू केल्यानंतर डाॅ. दिवसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्यात २१ विधानसभा मतदारसंघ असून, १५ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील मतदारांची संख्या ८४ लाख ५७ लाख ५७ हजार ४२६ इतकी आहे. त्यात ४५ लाख ३७ हजार ६९२ पुरुष, ४२ लाख १८ हजार ९४० महिला तर ७९४ तृतीयपंथी मतदार आहेत. एकूण मतदारांमध्ये दिव्यांग मतदारांची संख्या ८८ हजार ५३६ असून, ५ हजार २६४ मतदार शंभरी पार केलेले आहेत. नवमतदारांमध्ये अर्थात १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या १ लाख ६५ हजार २३९ इतकी आहे. तसेच २० ते २९ या वयोगटातील मतदार १५ लाख २९ हजार ७७९ इतके आहेत. सेवा मतदारांची संख्या ५ हजार ६०० आहे.

सर्वाधिक मतदार चिंचवडमध्ये

जिल्ह्यात सर्वाधिक ६ लाख ५५ हजार १०६ इतके मतदार चिंचवड मतदारसंघात आहेत, तर सर्वात कमी २ लाख ८२ हजार ६९७ मतदार कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात आहेत. जिल्ह्यात सहा लाखांहून अधिक मतदार चिंचवडसह हडपसर व भोसरी मतदारसंघात आहेत. हडपसर मतदारसंघात ६ लाख १९ हजार ६९४, तर भोसरी विधानसभा मतदारसंघात ६ लाख ८४८ मतदार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत एकूण मतदार ८७ लाख १९ हजार ९२० इतके होते. तर १५ ऑक्टोबर रोजी ही संख्या ८७ लाख ५७ हजार ४२६ इतकी आहे. त्यानुसार केवळ दीड महिन्याच्या काळात जिल्ह्यात ३७ हजार ५०६ मतदारांची भर पडली आहे.

मतदान केंद्र वाढणार ५० ते ६० ने

जिल्ह्यात ८ हजार ४१७ मतदान केंद्र असून, भोर मतदारसंघात सर्वाधिक ५६४, त्या खालोखाल चिंचवड मतदारसंघात ५६१; तर हडपसर मतदारसंघात ५२५ मतदान केंद्र आहेत. सर्वात कमी २६८ मतदान केंद्र कसबा विधानसभा मतदारसंघात आहेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या दहा दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणी सुरू राहणार असल्याने एकूण मतदान केंद्रांच्या संख्येत किमान ५० ते ६० ने वाढ होऊ शकते, अशी शक्यता जिल्हाधिकारी डाॅ. सुहास दिवसे यांनी या वेळी व्यक्त केली. मतदारांच्या नोंदणीवरून यंदा पुरुष महिला गुणोत्तर वाढले असल्याचेही त्यांनी सांगितले. २०२३ मध्ये जिल्ह्यात १००० पुरुषांमागे महिलांचे प्रमाण ९१० इतके होते. तर २०२४ मध्ये हेच प्रमाण ९२५ इतके झाले आहे. मतदार जागृती तसेच नोंदणीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमधून हे प्रमाण वाढले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Mahayuti or Mahavikas Aghadi The fate of 21 MLAs is in the hands of 87 lakh Pune residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.