मेहबूबा मुफ्तींकडून ‘एफटीआयआय’ला शाबासकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 08:41 PM2018-05-16T20:41:25+5:302018-05-16T20:44:07+5:30
‘एफटीआयआय’ने जम्मू-काश्मीरमध्ये घेतलेल्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांमुळे येथील तरुण पिढीला व्यक्त होण्यासाठी एक महत्त्वाचे सर्जनशील माध्यमच उपलब्ध झाले आहे
पुणे : एफटीआयआयतर्फे प्रशिक्षण शिबिरांत श्रीनगर येथे स्थिर छायाचित्रण आणि पटकथा लेखन असे दोन लघु अभ्यासक्रम घेण्यात आले. २५ एप्रिल ते १४ मे या कालावधीत झालेल्या या शिबिरांना जम्मी-काश्मीरमधील चित्रपटप्रेमी आणि विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला यांची मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतली. संस्थेच्या कामाच्या व्याप्ती आणि दूरदृष्टीची मुफ्ती यांनी प्रशंसा केली. काश्मीरच्या भूमीत चित्रपटाची मुळे अधिक खोलवर रुजावीत, यासाठी भविष्यात नवीन अभ्यासक्रम सुरु करुन तेथील जनतेमध्ये चित्रपट साक्षरतेला चालना देण्याची ग्वाही यावेळी कँथोला यांनी दिली.
‘सर्वांसाठी चित्रपट प्रशिक्षण’ या वाक्याचा शब्दश: अंगीकार करून गेल्या वर्ष-सव्वा वर्षात पुण्याप्रमाणेच देशभरातील विविध ठिकाणी; विशेषत: छोटया शहरांतही चित्रपटांसंदर्भात मर्यादित मुदतीचे विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करणा-या ‘एफटीआयआय’ची पाठ मुफ्ती यांनी कौतुक केले. एखादी गोष्ट सांगण्यासाठी सिनेमा हे एक महत्त्वाचे माध्यम ठरू शकते, यात शंकाच नाही. ‘एफटीआयआय’ने जम्मू-काश्मीरमध्ये घेतलेल्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांमुळे येथील तरुण पिढीला व्यक्त होण्यासाठी एक महत्त्वाचे सर्जनशील माध्यमच उपलब्ध झाले आहे. भविष्यात अशा अभ्यासक्रमांसाठी आपला 'एफटीआयआय'ला पूर्ण पाठिंबा असेल’, असे मेहबूबा या वेळी म्हणाल्याचे भुपेंद्र कँथोला यांनी सांगितले.