‘माहेर’ला मिळाला ९१वा जावई!
By admin | Published: December 11, 2015 12:53 AM2015-12-11T00:53:21+5:302015-12-11T00:53:21+5:30
‘सनई-चौघड्यांच्या स्वरात, ढोलताशाच्या गजरात नवरदेव विवाह मंचकावर येताच फुलांचा वर्षाव व राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या साक्षीने ‘माहेर’मधील दोन मुलींचा शास्त्रोक्त पद्धतीत विवाह झाला
कोरेगाव भीमा : ‘सनई-चौघड्यांच्या स्वरात, ढोलताशाच्या गजरात नवरदेव विवाह मंचकावर येताच फुलांचा वर्षाव व राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या साक्षीने ‘माहेर’मधील दोन मुलींचा शास्त्रोक्त पद्धतीत विवाह झाला. पद्मावती ऊर्फ आरती व अश्विनी यांना सांसारिक आयुष्याचे जोडीदार मिळाले आणि ‘माहेर’च्या संस्थपिका सिस्टर लुसी कुरियन यांनी आतापर्यंत ९१ निराधार मुलींचे कन्यादान केले.
‘माहेर’ या सेवाभावी संस्थेच्या महाराष्ट्रासह देशभरात ३७ पेक्षा जास्त शाखा आहेत. वढु बुद्रुक (ता. शिरूर) येथे १३० मानसिक आजाराने पीडित महिला, ४० अनाथ पुरुष, ४० वृद्ध , कुमारी मातांसह पारधी समाजाची १२० पेक्षा जास्त मुलं-मुली आहेत. उच्च शिक्षण देत मुलांना स्वत:च्या पायावर उभे करताना मानवता हाच खरा धर्म समजून त्या मुलांचे लग्नही करण्यात येते. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचा ‘स्टुडंट ग्रुप’ही स्थापन करण्यात आला असून, मिनी बँकही आहे. मात्र, या सर्वांचे संगोपन करताना शासनाच्या एका रुपयाच्या मदतीशिवाय हे कामकाज चाहलते, हे विशेष.
पद्मावती ऊर्फ आरती हिला सातारा येथील डॉक्टरांनी २०१४मध्ये माहेरमध्ये दाखल केले. तर, अश्विनी ही पुण्यातील नाना पेठ येथील एका संस्थेतून २०११मध्ये माहेरमध्ये दाखल झाली. आरतीचा विवाह पोहरे (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथील संजय यांच्याशी व अश्विनी हिचा विवाह गुणोरे (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील अमोल याच्याशी झाला. आज सकाळी साखरपुडा, हळदी समारंभ उरकल्यानंतर खासदार व छत्रपती शिवाजीमहाराजांचे १३वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले व ‘माहेर’च्या संस्थापिका ल्युसी कुरियन व अनेक मान्यवरांच्या साक्षीने लग्न सोहळा पार पडला. या लग्न सोहळ्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर भूमकर, बाळासाहेब खैरे, सातारा येथील जिल्हा परिषदेचे सभापती सुनील काटकर, माजी नगराध्यक्षा रंजान रावत, वढू बुद्रुकचे माजी सरपंच साहेबराव भंडारे, उत्तमराव भोंडवे, श्रीमंत झुरुंगे, माजी उपसरपंच गणेश गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी भंडारे व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
आतापर्यंत कुरीयन यांनी ८९ मुलींचे कन्यादान केले होते. आज झालेल्या दोन्ही मुलींच्या कन्यादान भुमकर कुटुंबियांनी केल्याने माहेरमध्ये आज ९१वा लग्न सोहळा पार पडला. (वार्ताहर)