‘माहेर’ने राबविला जलपुनर्भरण उपक्रम
By admin | Published: July 14, 2016 12:41 AM2016-07-14T00:41:52+5:302016-07-14T00:41:52+5:30
मागील काही महिन्यांत शहर व तालुक्याने पाणीटंचाईची परिस्थिती अनुभवली. टंचाईच्या काळातच खरे पाण्याचे महत्त्व कळते.
शिरूर : मागील काही महिन्यांत शहर व तालुक्याने पाणीटंचाईची परिस्थिती अनुभवली. टंचाईच्या काळातच खरे पाण्याचे महत्त्व कळते. मात्र, याची कायमस्वरूपी जाणीव ठेवणे गरजेचे आहे. याची खऱ्या अर्थाने येथील अनाथ मुलांच्या ‘माहेर’ या संस्थेने जाणीव ठेवली व आपल्या इमारतीत जलपुनर्भरण उपक्रम राबविला. असा उपक्रम प्रत्येकाने राबविला, तर पाण्याची समस्या कमी होऊ शकेल.
पाणी उपलब्ध असले की मुबलक पाण्याचा वापर करायचा. ही नागरिकांची सवय बनली आहे. झाडांच्या कत्तलीमुळे जंगले नष्ट होत चालली आहे. वृक्षलागवडीचे महत्त्व अद्याप नागरिकांना पटले नाही. अशामुळे पर्जन्यमानाची अनिश्चितता अनुभवयास मिळत आहे.
मागील वर्षी (२०१५) कमी पाऊस झाला. परिणामी, शहर व तालुक्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. शहरात मार्च महिन्यापासून पाणीटंचाई सुरू झाली. जूनअखेर बंधारा कोरडा पडला. अशाप्रकारची टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पावसाचा प्रत्येक थेंब उपयोगात आणणे गरजेचे आहे.
घराच्या छतावरील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जाते. हे पाणी वाया न जाता त्याचा उपयोग व्हावा, याबाबत अनेकदा आवाहन करण्यात येते. शहरात अथवा तालुक्यात क्वचितच असा उपयोग करण्यात आला असावा.
शिरूरपासून एक किलोमीटर अंतरावर रामलिंग रस्त्यावर अनाथांची ‘माहेर’ संस्था आहे. दोन मजली इमारतीत ३० मुले येथे राहतात. या संस्थेच्या संस्थापिका ल्युसी कुरियन यांच्या संकल्पनेतून या इमारतीच्या छतावरील पाणी पाईपद्वारे खाली घेण्यात आले. विंधनविहिरीच्या पाईपच्या बाजूला खड्डा घेऊन तेथे हे पाणी सोडण्याचा उपक्रम राबविण्यात आला. पाईपाच्या बाजूला खड्ड्यात पाणी शुद्धीकरण करणासाठी खाली प्रथम वाळू, त्यावर मोठी वाळू, त्याच्यावर खडी (४ एमएम.) त्यावर विटाचे तुकडे टाकण्यात आले. छतावरील पाणी पाईपद्वारे येथे पडते. विंधनविहिरीच्या पाईपला छोटे छिद्रे पाडण्यात आले आहे. त्याबाजूला जाळी लावण्यात आली आहे. छतावरील पाणी शुद्ध होऊन या पाईपमध्ये जाते. अशा पद्धतीने जलपुनर्भरणाचा उपक्रम ‘माहेर’ने राबविला आहे. या सिझनमधील झालेल्या पावसाच्या पाण्याचे ‘माहेर’ने जलपुनर्भरण उपक्रमाद्वारे चांगले नियोजन केल्याने पाण्याची पातळी वाढली. (वार्ताहर)