माहेरच्या आठवणीने जीव कासावीस होतो...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:10 AM2021-05-18T04:10:19+5:302021-05-18T04:10:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘माहेर’ म्हणजे प्रत्येक मुलीचा हळवा कोपरा. माहेरचा विषय निघाला की मुलींच्या डोळ्यात टचकन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘माहेर’ म्हणजे प्रत्येक मुलीचा हळवा कोपरा. माहेरचा विषय निघाला की मुलींच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. आई, वडील किंवा भावाची ख्यालीखुशाली विचारण्यासाठी फोन जरी आला तरी तिचं मन हळवं होतं. मग तासनतास गप्पा रंगू लागतात, त्यांना किती सांगू किती नको असं होऊन जातं. मुलांच्या सुट्ट्या कधी लागतायंत नि दूर गाव असलेल्या माहेरी कधी जायला मिळतंय असं मुलींना वाटू लागतं. पण गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनाने सर्वच थांबलंय.’ आई-बाबा किंवा भाऊ, वहिनी कोरोनाने आजारी आहेत. असं कळूनही जाता येत नाही. रोज डोळ्यांत पाणी येतं. त्यांच्या आठवणीने जीव कासावीस होतो. ही व्यथा आहे विवाहित मुलींची! कधी कोरोना जातोय नि माहेरच्या लोकांना डोळे भरून पाहातोय असं झालंय. पुन्हा भेट होईल की नाही? अशी भीती वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दरवर्षी उन्हाळी, दिवाळी आणि नाताळच्या सुट्ट्या लागल्या की मुलींना माहेरपणाचे वेध लागतात. आई-बाबा आणि इतर नातेवाईक मंडळी देखील मुलीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात. पण यंदा नवीन लग्न झालेल्या मुलींचं आणि विवाहितांचं माहेरपणंच कोरोनाने हिरावून घेतल्यासारखं झालं आहे. कोरोनाच्या संचारबंदीमुळे गावची कूस ओलांडता येत नाही. त्यामुळे पुण्याबाहेर माहेर असलेल्या मुली दीड वर्ष माहेरी जाऊ शकलेल्या नाहीत. रोज माहेरून फोन येतो. आई सातत्याने कधी येणार अशी विचारणा करते आणि मन हेलावून जाते. कोरोनामुळे रोज जवळची माणसं दगावत असल्याचे कानावर येत असल्याने मनात भीती निर्माण होत आहे. सतत एका दडपणाखाली राहावे लागत असल्याचे विवाहित स्त्रियांकडून सांगण्यात आले आहे.
---
माझं माहेर नागपूर. लग्न होऊन दीडच वर्षे झाले आहे. लग्नानंतर सहा महिन्यांनी माहेरी जाऊन आले. त्यानंतर कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जाता आले नाही. यंदाच्या एप्रिलमध्ये माहेरच्या सर्वांना कोरोना झाल्याचा फोन आला. आई-बाबांची काळजी घेण्यासाठी मी तिथं जायला हवं असं सारखं वाटत होतं. पण नागपूर हे कोरोनाचा हॉटस्पॉट बनल्यामुळे इच्छा असूनही जाता आलं नाही आणि काही दिवसांतच आई-बाबा कोरोनाने गेल्याचा फोन आला. शेवटचे त्यांना पाहता आणि भेटता आले नाही. ही सल आणि दु:ख कायमच मनात राहील.
- जयश्री, मुलगी
---
माझ माहेर पुण्यात आणि सासर ठाण्यात आहे. दरवर्षी मे महिन्यात किंवा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही पुण्याला येतो. आई देखील माझी आणि मुलांची आतुरतेने वाट पाहत असते. मात्र कोरोनामुळे गतवर्षी आणि यंदाही जाता आलेले नाही. गेल्या महिन्यात आई आजारी पडली. तिच्यात कोरोना सदृश्य लक्षणे दिसल्याचे ऐकल्यानंतर मी काय करू कशी जाऊ? अशी घालमेल सुरू होती. मला जाणं शक्य होत नव्हत. कारण आमच्या सोसायटीमध्ये कोरोना रूग्ण आढळल्याने सोसायटी सिल केली होती. माहेरहून मला नको येऊ सांगत होते. पण मन आईकडे धाव घेत होते. यातच डिसेंबरमध्ये माझ्या सासूबाई कोरोनाने गेल्यामुळे आईचे अधिकच टेंंशन आले होते. पण आई त्यातून सुखरूप बाहेर पडली. याबद्दल मी देवाचे शतश: आभार मानते. एरवी जाता आलं नाही ठीक होतं, पण आईला बरं नसताना जाता येत नाही याचा त्रास अधिक होतो. तिला थोडं जरी काही झालं तरी मी लगेच पुणे गाठते. पण कोरोनामुळे दीड वर्ष आईला पाहिलेलं नाही.
-सुजाता सुर्वे-शिंदे, मुलगी
---
कोरोनामुळे दोन वर्षात मुलीला आणि नातवंडांना भेटता आलेले नाही. दीड महिन्यांपूर्वी माझ्यातही कोरोना सदृश्य लक्षणे होती. त्यातून बरी झाले आहे. पण कुठे जाऊ शकत नाही. कधीतरी अधूनमधून मुलीकडे ठाण्याला जायचे पण तिच्याकडेही आता जाता येत नाही. तिला पाहाता आणि भेटता येत नाही याचं खूप वाईट वाटतं.
- स्मिता सुधाकर सुर्वे, आई
--
दरवर्षी मे महिन्यात चिपळूणला मामाच्या गावी आंबे खायला जायचो. आम्ही मुले खूप मज्जा करायचो. पण कोरोनामुळे जाताच येत नसल्याने सगळं खूप मिस करतोय. कधी एकदा तिकडे जातोय मनसोक्त फिरतोय, आंबे खातोय, समुद्रावर खेळतोय असं झालंय.
- शंतनू पेंडसे, मुलगा