पुण्यात रंगला 'लोकमत स्वर चैतन्य' दिवाळी पहाटचा कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 12:11 PM2019-10-28T12:11:49+5:302019-10-28T12:29:28+5:30
राकेश चौरसिया यांच्या मंजूळ आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या वेणूच्या गुंजनातून जणू नंदनवन अवतरल्याची प्रचिती आली तर महेश काळे यांच्या अद्वितीय स्वरांनी रसिकांना माधुर्यतेची मेजवानी दिली.
पुणे - दिव्यांच्या तेजाने लखलखलेल्या दाही दिशा... धुक्याने लपेटून घेतलेली सृष्टी... पाखरांचा मधुर किलबिलाट... मनाला प्रफुल्लित आणि सुखावून टाकणारा हवेतील गारवा... अन् सप्तसुरांनी मोहून गेलेला आसमंत अशा मंतरलेल्या वातावरणात सोमवारी रसिकांची पहाट 'स्वरचैतन्या' ने बहरली. राकेश चौरसिया यांच्या मंजूळ आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या वेणूच्या गुंजनातून जणू नंदनवन अवतरल्याची प्रचिती आली तर महेश काळे यांच्या अद्वितीय स्वरांनी रसिकांना माधुर्यतेची मेजवानी दिली. राकेश चौरसिया यांची बासरी आणि महेश काळे यांच्या गायन जुगलबंदीने उत्तरार्धात कळस गाठला. निमित्त होते, युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत आणि डॉ. सागर गणपतराव बालवडकर यांच्या सहयोगाने आयोजित 'लोकमत स्वर चैतन्य' दिवाळी पहाट कार्यक्रमाचे. कार्यक्रम स्थळी पाय ठेवायला देखील जागा नव्हती. इतकी रसिकांची कार्यक्रमाला अभूतपूर्व गर्दी झाली होती.
आंतराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ बासरीवादक गुरू पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी निर्मित केलेल्या 'प्रभातेश्वरी' रागापासून राकेश चौरसिया यांनी मैफलीला प्रारंभ केला. वेणूवर लीलया फिरणाऱ्या जादुई बोटांनी रसिकांवर मोहिनी घातली. बासरीच्या मोहक सुरांनी अवघे वातावरण 'गोकुळमय' झाले. तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचे चिरंजीव पं. सत्यजित तळवलकर यांच्या तबल्यावरील हुकूमतीने रसिकांना जिंकले. राकेश चौरसिया आणि पं. तळवलकर यांनी अप्रतिम जुगलबंदीने मैफिल खिळवून ठेवली. त्यानंतर महेश काळे यांचे मंचावर आगमन होताच रसिकानी टाळ्यांचा कडकडाट केला. भूपाल तोडी रागाने मैफलीचा श्रीगणेशा करीत 'कैसे रिजाऊ' ही बंदिश त्यांनी खुलवली.
पं. जितेंद्र अभिषेकी यांनी प्रथमच संगीत दिग्दर्शित केलेल्या ' संगीत मत्स्यगंधा' नाटकातील 'अर्थशून्य भासे' या पदापासून 'गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी', 'दिवस मावळता धाव किनाऱ्याशी', 'तव अंतरा झाला मन रमता मोहना', 'साद देती हिमशिखरे', ' या तिथे जाता संगम तो सारितांचा', 'गुंतता ह्र्दय हे', 'देवाघरचे ज्ञात कुणाला' अशी नाट्यपदांची मालिका त्यांनी सादर केली. रसिकांच्या फर्माईशीनंतर 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटातील 'मन मंदिरा तेजाने' आणि 'अबीर गुलाल'चे बहारदार सादरीकरण करून महेश काळे यांनी रसिकांची मने जिंकली. मैफलीच्या उत्तरार्धात राकेश चौरसिया आणि महेश काळे यांच्या गायन जुगलबंदीने कळससाध्य गाठला. 'पायोजी मैने रामरतन धन पायो' च्या सादरीकरणात शब्द नि सुरांचा अनोखा संगम रसिकांनी अनुभवला. 'सूर निरागस हो' च्या नाट्यपदाने मैफलीची सांगता झाली.