आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महेश लांडगेंची शिरूरमध्ये मोर्चेबांधणी सुरू?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 02:41 PM2021-11-29T14:41:27+5:302021-11-29T14:56:16+5:30
लांडगे हे भोसरी विधानसभेचे प्रतिनिधित्व करीत असतानासुद्धा त्यांचे शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात फ्लेक्सची बॅनरबाजी करण्यात आली
पिंपरी-चिंचवड:शिरुर लोकसभा मतदारसंघात शिरूर-हवेली, खेड, जुन्नर, आंबेगावसह हडपसर व भोसरी विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. यात भोसरी विधानसभा सोडली तर पाचही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार तर भोसरीमध्ये भाजपचे महेशदादा लांडगे विजयी झाले होते. शिरूर लोकसभेमध्ये राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे प्रतिनिधित्व करीत आहेत. २०२४ मध्ये होणा-या लोकसभेसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच भाजप पक्षानेही यात आघाडी घेतली आहे.
२७ नोव्हेंबर रोजी आमदार महेशदादा लांडगे यांचा वाढदिवस आहे. लांडगे हे भोसरी विधानसभेचे प्रतिनिधित्व करीत असतानासुद्धा त्यांचे शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात फ्लेक्सची बॅनरबाजी करण्यात आली. या बॅनरमध्ये दिल्ली येथील संसद भवनचे बॅकग्राउंड व आपला महेशदादा मावळा शिवनेरीचा, भावी खासदार शिरूरचा अशा आशयाचे हे फ्लेक्स सगळीकडे लक्ष वेधून घेत आहे. त्यातच येणा-या काळात साखर कारखाने, जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटी या निवडणुकीत भाजपने तरुणांच्या मनातील आमदार महेशदादा यांच्या रूपाने ताकद मिळणार असल्याचे या फ्लेक्सच्या माध्यमातून चित्र तयार झाले आहे.
पक्षाने उमेदवारी दिली तर लोकसभा लढविणार : आमदार महेश लांडगे
भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाचे बॅनर शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात लागले असल्याने याबाबत महेश लांडगे यांना विचारले असता त्यांनी मी कोणालाही भावी खासदार म्हणून बॅनर टाकण्यास सांगितले नाही; मात्र कार्यकर्त्यांचे पाठबळ व पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिली तर नक्कीच लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.