चोरीच्या पैशातून महेश मोतेवारने 'दगडूशेठ'ला दान केला दीड किलो सोन्याचा हार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 05:08 PM2021-03-16T17:08:41+5:302021-03-16T17:09:29+5:30
आता 'सीआयडी'च्या ताब्यात...
पुणे : समृद्ध जीवन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या महेश मोतेवार यांनी 'दगडूशेठ' हलवाई गणपतीला दान केलेला सोन्याचा हार 'सीआयडी'ने ताब्यात घेतला आहे. २०१३ मध्ये मोतेवारने हा हार दगडुशेठला दान केला होता. तब्बल दीड किलो सोन्याचा हा हार होता त्याची किंमत ६० लाखांवर आहे. धर्मादाय आयुक्तांच्या आदेशावरून ही कारवाई केली आहे.
समृद्ध जीवन मल्टिस्टेट पर्पज को- ॲापरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने विविध योजनांच्या अमिषाने देशभरातील लाखो गुंतवणुकदारांना तब्बल २५१२ कोटींचा गंडा घातला होता. याप्रकरणी मोतेवारची २०७ कोटींची प्रॅापर्टी ईडीने ॲटॅच केली होती. मोतेवारला या प्रकरणात २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती.
याविषयी बोलताना सीआयडी डीवायएसपी मनिषा पाटील म्हणाल्या; ”मोतेवारच्या पैशांचीची ट्रेल शोधत असताना या हाराविषयी आम्हाला माहिती मिळाली. लोकांची फसवणूक केलेल्या पैशातुनच हा हार घेतल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर आम्ही ट्रस्टशी बोलुन हा हार ताब्यात घेतलेला आहे.” या हाराची किंमत ६० लाख ५० हजार असल्याचे स्पष्ट झाले असून कोर्टाच्या आदेशाप्रमाणे याची पुढील कार्यवाही होईल.