जिल्ह्यातील २१ मतदान केंद्रांवर ‘महिलाराज ’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 07:33 PM2019-04-04T19:33:17+5:302019-04-04T19:48:37+5:30
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रथमच प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक या प्रमाणे हे मतदान केंद्र महिला व्यवस्थापित मतदान केंद्र असणार आहे.
पुणे : जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची जय्यत तयारी प्रशासनाच्या पातळीवर सुरु आहे. यामध्ये मतदान केंद्र निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, यामध्ये जिल्ह्यात २१ मतदान केंद्र शंभर टक्के महिला कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रथमच प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक या प्रमाणे हे मतदान केंद्र महिला व्यवस्थापित मतदान केंद्र असणार आहे.
गेल्या काही वर्षांत महिला मतदारांची मतदारांची वाढती संख्या लक्षात घेऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये देखील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगने यंदा प्रथमच लोकसभा निवडणुकीमध्ये प्रायोगिक तत्वावर एका मतदान केंद्राची संपूर्ण जबाबदारी महिलांना देण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यात २१ विधनसभा मतदार संघ असून, या प्रत्येक मतदार संघामध्ये एक केंद्र प्रायोगिक तत्वावर महिला कर्मचारी, अधिकाºयांची नियुक्ती करणार आहे. यामध्ये मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासह सर्वच जण महिला असतील. सर्व महिला व्यवस्थापित मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून ओळखली जाणार आहेत.
---
कसबा विधनसभा मतदार संघात पुरुषांपेक्षा महिला मतदार अधिक
पुणे जिल्ह्यात अनेक विधानसभा मतदार संघामध्ये महिला मतदारांची संख्या जवळजवळ पन्नास-पन्नास टक्के असे प्रमाण आहे. परंतु पुणे शहरातील कसब विधानसभा मतदार संघामध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. कसब्यात पुरुष मतदारांची संख्या १ लाख ४१ हजार ७५८ इतकी आहे, तर येथे महिला मतदार तब्बल १ लाख ४४ हजार १२९ ऐवढ्या आहेत. म्हणजेच पुरुषांपेक्षा २ हजार ३७१ महिला मतदार अधिक आहेत.
---
महिला सक्षमिकरण हाच मुख्य उद्देश
मतदार आणि मतदान प्रक्रियेमध्ये देखील महिलांची संख्या वाढत आहे. यामुळेच निवडणूक प्रक्रियेमध्ये लैंगिक समानता व महिलांच्या अधिक रचनात्मक सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक विधानसभा मतदार संघामध्ये किमान एक मतदान केंद्र महिला व्यवस्थापित मतदान केंद्र असणार आहे. यामागे महिला सक्षमीकरण हाच मुख्य उद्देश आहे.
- मोनिका सिंग, जिल्हा उपनिवडणूक निर्णय अधिकारी