पर्यटननगरीमध्ये येणार महिलाराज
By admin | Published: October 6, 2016 03:21 AM2016-10-06T03:21:12+5:302016-10-06T03:21:12+5:30
लोणावळा नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले असल्याने पुढील पाच वर्षे पर्यटननगरीमध्ये महिलाराज येणार
लोणावळा : लोणावळा नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले असल्याने पुढील पाच वर्षे पर्यटननगरीमध्ये महिलाराज येणार आहे.
लोणावळ नगर परिषद निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. परिषदेची निवडणूक ही द्विसदस्यीय पद्धतीने, तर नगराध्यक्ष निवड थेट जनतेमधून होणार असल्याने अध्यक्षपदाला महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्वांच्या नजरा आरक्षण सोडतीकडे लागल्या होत्या. नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने सर्वसाधारण प्रभागातील इच्छुकांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला आहे.
राज्यातील आगामी नगरपालिका निवडणुकांसाठी नगराध्यक्षपदाची सोडत बुधवारी मुंबईमध्ये काढण्यात आली. या वेळी लोणावळा नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याचे समजल्यानंतर महिलांनी जल्लोष केला. सर्वसाधारण प्रवर्गातील इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली. वाढीव लोकसंख्येनुसार या वर्षी नगर परिषदेचा एक वॉर्ड वाढून वॉर्डची संख्या २५ झाली आहे. द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार १२ वॉर्डांमधून २५ जण आपले नशीब आजमावणार आहेत. २५ पैकी १३ जागा महिलांसाठी राखीव असून, नगराध्यक्षपददेखील महिलेसाठी राखीव झाल्याने नगर परिषदेमध्ये पुढील पाच वर्षे १४ महिला व १२ पुरुष असे समीकरण असणार असल्याने खऱ्या अर्थाने महिलाराज येणार आहे. (वार्ताहर)
नगराध्यक्षपदासाठी इच्छुक संख्या अधिक
४नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, कॉग्रेसच्या महिला ध्यक्षा संध्या खंडेलवाल, राष्ट्रवादी महिलाध्यक्षा अरुणा लोखंडे, शिवसेनेच्या संगीता कंधारे, सौम्या शेटटी, कॉँग्रेसच्या नगरसेविका शादान चौधरी, रेखा जोशी, भाजपाच्या महिला शहराध्यक्षा अपर्णा बुटाला या दावेदार असू शकतात. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे.