शिरूर पालिकेवर पुन्हा महिलाराज
By admin | Published: April 13, 2015 06:14 AM2015-04-13T06:14:54+5:302015-04-13T06:14:54+5:30
नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या प्रथम अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे.
शिरूर : नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या प्रथम अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. २०११ च्या निवडणुकीतही पहिली अडीच वर्षे सर्वसाधारण महिलेसाठीचे आरक्षण होते.
सध्या ओबीसी महिला नगराध्यक्षपदावर विराजमान आहेत. पुन्हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने, नगर परिषदेवर पुन्हा महिलाराज येणार आहे.
मुंबई येथे काढण्यात आलेल्या नगराध्यक्षपदाच्या सोडतीत नगराध्यक्षा सुनीता कालेवार व नगरसेविका कविता वाटमारे यांनी चिठ्ठी काढली.
यात प्रथम अडीच वर्षे सर्वसाधारण महिलेची चिठ्ठी निघाली. नगर परिषदेवर शिरूर शहर विकास आघाडीची सत्ता असून, पहिल्या अडीच वर्षांत सर्वसाधारण महिलेचे आरक्षण निघाल्याने नगर परिषदेच्या १४२ वर्षांच्या इतिहासात उज्ज्वला बरमेचा यांच्या रूपाने प्रथमच महिलेला नगराध्यक्षा होण्याचा मान मिळाला. महिलांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याने पहिली अडीच वर्षे बरमेचा यांच्यासह अलका सरोदे व सुवर्णा लटांबळे यांना संधी मिळाली. दुसऱ्या अडीच वर्षांसाठी इतर मागासवर्गीय महिलेची चिठ्ठी निघाली, यातही तिघींना संधी दिली जाणार आहे. सध्या कालेवार या नगराध्यक्षपदी असून, मनीषा गावडे व सुवर्णा लोळगे यांना संधी दिली जाणार आहे. पुढील वर्षअखेर निवडणूक होणार आहे. (वार्ताहर)