Mahrashtra Election 2019 : विश्वंभर चाैधरी यांची माघार ; निवडणूक न लढविण्याचा घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 08:10 PM2019-10-03T20:10:29+5:302019-10-03T20:19:50+5:30
काेथरुडमधून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विराेधात उतरण्याचा निर्णय सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चाैधरी यांनी मागे घेतला आहे.
पुणे : काेथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा विचार करणाऱ्या विश्वंभर चाैधरी यांनी अखेर आपला विचार बदलला असून निवडणूक न लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. फेसबुक पाेस्ट लिहून त्यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे.
राज्याच्या निवडणूकीत सर्वांचेच लक्ष लागलेल्या काेथरुड मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास विश्वंभर चाैधरी यांनी देखील तयारी दर्शवली हाेती. चंदक्रांत पाटील यांना आव्हान देण्यासाठी ते सज्ज झाले हाेते. त्यांना स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी यांनी निवडणूक लढविण्याची ऑफर दिली हाेती. काेथरुडमधून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे रिंगणात उतरले आहेत. आघाडीकडून काेथरुडची जागा मित्र पक्षाला साेडण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. त्याबाबतची घाेषणा अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केली हाेती. त्यानंतर राजू शेट्टी यांनी चाैधरी यांना निवडणूक लढविण्याबाबत विचारले असता त्यांनी देखील तयारी दर्शवली हाेती. त्यासाठी सर्व विराेधी पक्षांचे एक्य झाल्यास निवडणूक लढविण्यास ते तयार हाेते. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काेथरुडमधून किशाेर शिंदे यांना उमेदवारी जाहीर केल्याने तसेच आपने देखील डाॅ. अभिजीत माेरे यांना उभे केल्याने मतांचे विभाजन टाळण्यासाठी चाैधरी यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
कोथरूड मतदार संघातून विधानसभा लढवावी असा प्रस्ताव मला मित्रवर्य राजू शेट्टी यांनी दिला होता. त्यावर खूप विचार करून मी सुद्धा मनाची तयारी केली आणि विरोधी पक्षांमध्ये सर्वसहमती झाली तर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दाखवली. भाजपाच्या धनदांडग्या आणि धर्मवादी राजकारणाविरोधात सर्वसहमतीचे उदारमतवादी राजकारण आणि लोकशाही वाचवण्याचा अजेंडा यासाठी निवडणूक लढावी हा विचार मी चळवळीतील साथींशी, मित्रांशी बोलून पक्का केला होता.सुदैवाने अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांचा पाठिंबा मिळाला. मतांची विभागणी न होता एकत्र लढण्यातूनच बलाढ्य पक्षाच्या उमेदवारांना चितपट केले जाऊ शकते ही धारणा आपण रूजवू शकलो. मात्र शेवटी सर्वसहमती होऊ शकली नाही. मनसे आणि आप यांचे उमेदवार मैदानात राहणार हे निश्चित झाल्यानंतर मतविभागणी होणे अटळ आहे. त्यामुळे कालपासून पुन्हा अनेक साथींशी, मित्रांशी, तरूण कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर ही मतविभागणी टळावी म्हणून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. असे चाैधरी यांनी आपल्या फेसबुक पाेस्टमध्ये म्हंटले आहे.