Mahrashtra Election 2019 : मतदान करा अन एका मिसळवर एक फ्री मिळवा !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 03:55 PM2019-10-20T15:55:43+5:302019-10-20T15:56:47+5:30
जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी पुण्यातील कडक मिसळ येथे एका मिसळवर एक मिसळ फ्री देण्याची ऑफर ठेवण्यात आली आहे.
पुणे : विधानसभेची निवडणुक 21 तारखेला हाेत आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदानाची आकडेवारी पाहता मतदानाची टक्केवारी कमी झाली असल्याचे समाेर आले आहे. पुण्यात लाेकसभेला पन्नास टक्क्यांच्या आत मतदान झाले हाेते. कमी मतदान झाल्यास त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर हाेत असताे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरीकांनी घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी आता विविध व्यवासायिक पुढे सरसावले आहेत. पुण्यातील कडक मिसळ या ठिकाणी मतदान केल्यास एका मिसळवर एक मिसळ फ्री देण्याची ऑफर नागरिकांना देण्यात आली आहे.
संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क दिला आहे. मतदानाच्या माध्यमातून आपले सरकार निडवण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून मतदानाची टक्केवारी घटताना दिसत आहे. नागरिक मतदानाची सुट्टी फिरायला जाण्यासाठी किंवा सिनेमाला जाण्यासाठी वापरत आहेत. नागरिकांमध्ये मतदानाबाबत अनास्था दिसून येते. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी प्रशासन माेठ्याप्रमाणावर प्रयत्न करत असते.
त्यातच आता पुण्याचे काही व्यावसायिक देखील नागरिकांना विविध ऑफर देऊन मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. पुण्यातील काेथरुड भागात असणाऱ्या कडक मिसळ या ठिकाणी मतदान करुन आल्यास एका मिसळवर एक फ्री मिळणार आहे. परंतु यासाठी दाेन्ही नागरिकांनी मतदान करणे आवश्यक आहे. मतदान केल्याची बाेटावरची शाई दाखविल्यावरच मिसळ फ्री देण्यात येणार आहे.
याबाबत सांगताना कडक मिसळचे केतन तेंदले म्हणाले, मतदानाचा अधिकार हा संविधानाने आपल्या सर्वांना दिलेला एक मूलभूत अधिकार आहे आणि तो प्रत्येक वेळी विचारपूर्वक वापरणे हे आपले आद्य कर्तव्यच आहे. ह्यामुळे लोकशाही नुसतीच टिकत नाही तर उत्स्फूर्त मतदानाचा टक्का वाढल्यावर लोकशाही आणखी सक्षम होण्याच्या दृष्टीने राष्ट्राला त्याचा निश्चितच दीर्घकालीन लाभ होतो. आम्ही देखील ह्याच भावनेने प्रेरित होऊन ह्या घटनात्मक लोक-उत्सवाला आमच्या परीने आणखी विस्तृत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याचाच एक भाग म्हणुन दिनांक २१ ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करुन येणाऱ्या प्रत्येक नागरिकास आम्ही आमच्या एका कडक मिसळवर दुसरी कडक मिसळ फ्री देणार आहोत. हा संकल्प व्यावसायिक दृष्टिकोन हा मुद्दा नसुन मतदान ही एक लोक- चळवळ व्हावी हीच भावना आम्ही जपण्याचा आणी वाढवण्याचा प्रयत्न करित आहोत.