हळूहळू तिने चाेरले तब्बल 30 ताेळे साेने
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 08:07 PM2018-09-05T20:07:03+5:302018-09-05T20:09:48+5:30
घरकाम करणाऱ्या महिलेने मालकिनीच्या घरातून तब्बल 30 ताेळे साेने लंपास केल्याची घटना सिंहगड राेड परिसरात उघडकीस अाली अाहे.
पुणे : घरकाम करणाऱ्या महिलेने ज्या घरांमध्ये ती काम करायची त्या घरांमध्ये थाेडेथाेडे करत तब्बल 30 ताेळे साेने लंपास केले. या दागिण्यांची किंमत 5 रुपये इतकी अाहे. चाेरी करणाऱ्या महिलेला सिंहगड राेड पाेलिसांनी अटक केली असून तिच्याकडून चाेरीचे दागिने हस्तगत करण्यात येत अाहेत. मंगळवारी ही घटना समाेर अाली.
याप्रकरणी प्रिती गिरीधर करंदीकर (38 ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अाराेपी महिला ही करंदीकर यांच्याकडे 2018 पासून स्वयंपाकी म्हणून काम करते. करंदीकर यांनी त्यांचे वडिलाेपार्जित दागिने ज्या कपाटात ठेवले हाेते, त्या कपाटाला त्या कुलूप लावायला विसरल्या हाेत्या. ही गाेष्ट माेलकरणीच्या लक्षात अाली हाेती. तिने मागील दाेन ते तीन महिन्यांपासून थाेडे थाेडे दागिने चाेरण्यास सुरुवात केली. मंगळवारी करंदीकर या घर अावरत असताना त्यांना कपाटातील दागिने चाेरीला गेल्याचे लक्षात अाले. त्यांच्या घरातील माेलकरीण ही इतर ठिकाणी सुद्धा काम करत असल्याने त्यांनी शेजाऱ्यांकडे विचारपूस केली. तेव्हा त्यांनीही त्यांच्या घरातील 7 ते 8 ताेळे दागिने चाेरीला गेल्याचे सांगितले. त्यामुळे माेलकरणीवर संशय वाढल्याने करंदीकर यांनी सिंहगड राेड पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाेलिसांनी माेलकरणीला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर तिने दागिने चाेरल्याची कबुली दिली.