बीएचआर प्रकरणातील मुख्य सूत्रधारास ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:09 AM2021-07-01T04:09:39+5:302021-07-01T04:09:39+5:30
बीएचआर पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने जळगाव व इतर भागात छापे टाकून १८ जणांना अटक केली आहे. त्याला ...
बीएचआर पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने जळगाव व इतर भागात छापे टाकून १८ जणांना अटक केली आहे. त्याला इंदूर येथून ताब्यात घेऊन बुधवारी जिल्हा न्यायालयात दुपारी हजर करण्यात आले. कंडारे आणि इतर आरोपींनी कट रचून पतसंस्थेच्या मालमत्तेची कमी किमतीत बनावट लिलाव प्रक्रियेद्वारे विक्री केली. त्यातील दोन मालमत्ता या आरोपी सुनील झंवर व अटक आरोपी सूरज झंवर यांनी विकत घेतल्या आहेत. दोन मालमत्ता त्यांच्या नातेवाईकांनी विकत घेतल्या असून त्याकरिता सुनील झंवर यांनीच पैसा पुरविल्याचे निष्पन्न झाले. या कटाबाबत आरोपीकडे तपास करायचा आहे. अटक आरोपी जितेंद्र कंडारे, आरोपी सुनील झंवर महावीर जैन व सूरज झंवर यांनी किती कर्जदाराच्या फाईल एफडी वर्ग करून निरंक केल्या आहेत. अशा कर्जदार आणि ठेवीदाराबाबत आरोपीकडून माहिती मिळवायची आहे. दोन आरोपी अद्याप फरार आहेत, असा युक्तिवाद सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी कंडारे याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
----------------------
आरोपी कंडारे याचा गुन्ह्यातील सहभाग
* केंद्र शासनाच्या कृषी विभागाने बीएचआर मल्टिस्टेट को.आॅप सोसायटीवर नोव्हेंबर २०१५ मध्ये अवसायक जितेंद्र कंडारे याची नेमणूक केली. कंडारे हा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था या पदावर कार्यरत होता. पतसंस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल असल्यामुळे ठेवीदारांना पैसे मिळवून देण्यासाठी आरोपीची भूमिका महत्त्वाची होती.
कंडारे याने आरोपी कुणाल शहा, सुनील झंवर, सूरज झंवर व महावीर जैन यांच्याशी व इतर आरोपींशी संगनमत करून आरोपीने पतसंस्थेच्या मालकीच्या मालमत्ता लिलावाद्वारे विकण्यासाठी संकेतस्थळ तयार केले.
*नॅशनल इन्फॉरमॅटिक सेंटर (एनआयसी) च्या केंद्र आणि राज्य शासनाचे संकेतस्थळ उपलब्ध असताना आणि त्यात एकमेकांचे टेंडर पाहण्याची सुविधा नसल्यामुळे खासगी संकेतस्थळ तयार करण्यात आले.
* कर्ज निरंक दाखला देण्याच्या बदल्यात आरोपी कंडारे याने कर्जदारांकडून रोखीने पैसे स्वीकारून रकमेचा अपहार केल्याची शक्यता आहे.
* आरोपीने खासगी संकेतस्थळ तयार करण्याकरिता डबघाईला आलेल्या पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या मालकीचे ८२ लाख ३४ हजार २६० रुपयांची रक्कम फीच्या नावाखाली कुणाल शहाला देऊन रकमेचा अपहार केला आहे.