कोरोनासाठी नाही तर नाले सफाईसाठी मुख्य सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:11 AM2021-05-18T04:11:34+5:302021-05-18T04:11:34+5:30
पुणे : मागील सव्वा वर्षांपासून पुणे कोरोनाशी मुकाबला करीत आहे. या काळात पालिकेने कोट्यावधींचा खर्च केला आहे. या काळात ...
पुणे : मागील सव्वा वर्षांपासून पुणे कोरोनाशी मुकाबला करीत आहे. या काळात पालिकेने कोट्यावधींचा खर्च केला आहे. या काळात झालेल्या खर्चाचा लेखाजोखा मांडण्यासाठी तसेच याविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यसभा बोलाविण्याची मागणी विरोधी पक्षांनी अनेकदा केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले असून नालेसफाई विषयी चर्चा करण्यासाठी मुख्य सभा बोलवली आहे. सत्ताधाऱ्यांचा हा अजब कारभार असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे.
शहरात मागील दोन वर्षांपासून जोरदार पावसामुळे पूर येत आहे. या पुराला निकृष्ट दर्जाची नाले सफाई, ओढ्या-नाल्यांमधील केवळ कागदोपत्रीच काढला जाणारा गाळ, ठेकेदारांची कमी कामात अधिक फायदा लाटण्याची कार्यपद्धती आदी कारणे कारणीभूत आहेत. या कामांचा आढावा घेण्यासाठी तसेच पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी पालिकेची मुख्य सभा बोलावली आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठविली आहे.
कोरोना काळात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्याने पालिका प्रशासनाने विशेषाधिकारात कोट्यावधींची खरेदी केलेली आहे. या काळात खरेदीवरून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर टीकाही झाली आहे. विरोधी पक्षांनी हिशेब सुद्धा मागितले आहेत. मात्र, विरोधकांच्या टीकेची धार सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष करून बोथट केली. मात्र, वारंवार मागणी करूनही सत्ताधारी कोरोनाविषयक चर्चा करण्याकरिता मुख्य सभा घेत नाहीत. परंतु, नाले सफाई सारख्या विषयावर मात्र मुख्य सभा बोलावली जाते याचे आश्चर्य वाटत असल्याचा सूर विरोधी पक्षांनी लावला आहे.
--
कोरोनाची उपाययोजना करण्यासाठी तसेच अनुषंगिक विषयांवर बैठक घ्यायला महापौरांना वेळ नाही. पण, नाला साफसफाईसाठी मुख्य सभा बोलावली आहे. सत्ताधारी आणि प्रशासनाचा हा अजब कारभार आहे.
- आबा बागुल, गटनेते, काँग्रेस
--
कोरोनाच्या खर्चाबाबत अनेकदा मागणी करूनही स्पष्ट माहिती दिली जात नाही. खर्चाबाबत प्रशासनच खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. याविषयावर एक तरी मुख्य सभा होणे आवश्यक होते. मात्र, नाले सफाईवर मुख्य सभा बोलावण्यात आली आहे. ही सभा घेणे आवश्यक असल्यास त्याला हरकत नाही. मात्र, कोरोनाचा हिशोब पुणेकरांसमोर ठेवणे ही सुद्धा मुख्य सभेची जबाबदारी आहे.
- दीपाली धुमाळ, विरोधी पक्षनेत्या, पुणे महापालिका