धायरीतील मुख्य रस्ता गेला खड्ड्यात, ड्रेनेज चेंबरमधून उडतात कारंजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:11 AM2021-09-11T04:11:51+5:302021-09-11T04:11:51+5:30
पुणे शहरापासून अवघ्या आठ-नऊ किमीवर असणाऱ्या धायरी गाव आणि परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येथील दुचाकी-चारचाकीची वर्दळ वाढली ...
पुणे शहरापासून अवघ्या आठ-नऊ किमीवर असणाऱ्या धायरी गाव आणि परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येथील दुचाकी-चारचाकीची वर्दळ वाढली आहे. वर्दळीच्या तुलनेमध्ये गावातील रस्त्याचे रुंदीकरण मात्र झालेले नाही. अरुंद रस्ता, वाढलेली वर्दळ आणि त्यामध्ये रस्त्यावर वाहणारे नाल्याचे पाणी यामुळे धायरीकर त्रस्त झाले आहेत. नाल्याच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यांचा अंदाज घेताना आणि दुचाकीवरून ते खड्डे चुकविताना चालकांना अक्षरश: कसरत करावी लागत आहे.
या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी गेल्या वर्षी या रस्त्यावर वांजळे पुलापासून ते डीएसके चौकापर्यंत लोखंडी डिव्हाडर लावले आहे. मात्र रस्ताच अरूंद असल्यामुळे या डिव्हाडला धडकूनच अनेक अपघात झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी रस्त्याची डागडुजीही करण्यात आली मात्र तीही केवळ डीएसके चौकापर्यंत करण्यात आली. डीएसके चौकापासून पुढे चव्हाण शाळेपर्यंतचा रस्त्याची डागडुजी झालीच नाही.
--
चौकट
गावठाण भागात जाणारा एकच रस्ता
--
सिंहगड रस्त्यावरून धायरीत येण्यासाठी एकच रस्ता आहे. वांजळे पुलापासून ते डीएसके चौकापर्यंत हा रस्ता दुपदरी आहे. मात्र डीएसके रस्त्यापासून पुढे चव्हाणशाळेपर्यंत अनेक हा रस्ता अतिशय अरुंद झाला आहे. त्यातच या रस्त्याच्या दुतर्फा सकाळ-सायंकाळ भाजीविक्रेते बसतात, त्यामुळे भाजी घेण्यासाठी येणाऱ्या पादचाऱ्यांचीही येथे गर्दी असते. त्यामुळे सकाळी व सायंकाळी ये रस्त्यावर रोज एक अपघात ठरलेलाच असतो.
---
कोट
येथील ड्रेनेजलाईन जुनी व छोटी आहे अलीकडच्या चार-पाच वर्षांत येथे अनेक मोठ्या सोसायट्या झाल्या व त्या साऱ्यांचे ड्रेनेजलाईन याच छोट्या ड्रेनेजला जोडली गेली. त्यामुळे ड्रेनेजच्या क्षमतेपेक्षा जास्त सांडपाणी येत असल्याने येथील चेंबरमधून सातत्याने पाणी बाहेर येत आहे. ही ड्रेनेजलाईन बदलून नवी मोठी ड्रेनेज लाईन करावी यासाठीचा प्रस्ताव महापालिकेच्या मल:निसारण विभागाला दिला आहे. पुढील दोन महिन्यांत येथील ड्रेनेजलाईन बदलाचे काम सुरु होईल.
-हरिदास चरवड,
नगरसेवक, वडगाव-धायरी.