प्रमुख रस्त्यावरील दुभाजकांमध्ये गवत, झुडपे

By admin | Published: February 16, 2017 02:57 AM2017-02-16T02:57:45+5:302017-02-16T02:57:45+5:30

रस्त्यावरील दुभाजक आकर्षक असावेत, त्यामध्ये शोभेची झाडे असावीत... मात्र, जुन्नर सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष

In the main road dividers, grasses, shrubs | प्रमुख रस्त्यावरील दुभाजकांमध्ये गवत, झुडपे

प्रमुख रस्त्यावरील दुभाजकांमध्ये गवत, झुडपे

Next

जुन्नर : रस्त्यावरील दुभाजक आकर्षक असावेत, त्यामध्ये शोभेची झाडे असावीत... मात्र, जुन्नर सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. येथील जुने बस स्थानक ते छत्रपती शिवाजी पुतळ्यापर्यंतचा रस्ता, किल्ले शिवनेरीकडे जाणाऱ्या प्रमुख चौपदरी रस्त्याच्या दुभाजकांवर गवत, झुडपे वाढलेली आहेत.
किल्ले शिवनेरी परिसर विकास प्रकल्पांतर्गत जुन्या बस स्थानकाजवळील प्रवेशद्वार ते छत्रपती शिवाजी पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम करण्यात आले होते. उद्घाटनापासूनच निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा रस्ता वादग्रस्त ठरला होता. या रस्त्याच्या दुभाजकाचे बांधकाम पाहून अगदी उद्घाटनाच्या कार्यक्रमातच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘मी इंजिनिअर नाही; परंतु मला ओळंबा कळतो,’ अशी खरडपट्टी काढली होती. तर, पाचच महिन्यांनंतर पहिल्याच पावसाळ्यात रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांनी कामाचा दर्जा दाखवून दिला होता. पवारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर नव्याने काही अंतरापर्यंतचा दुभाजक बदलण्यात आला; परंतु दुभाजकांमध्ये शोभेची झाडे लावून त्याचे सुशोभीकरण करण्याची दृष्टी काही सार्वजनिक बांधकाम विभागाला लाभली नाही.
प्रवेशद्वारासमोरील दुभाजकांमध्ये उद्घाटनाच्या आदल्या दिवशी शोभेची आकर्षक झाडे सोडून भविष्यात मोठा विस्तार होईल, वाहतुकीला अडथळा ठरतील
असे वृक्ष लावण्यात आले. त्यांचीही पुन्हा काही देखभाल नाही. परिणामी, तशाच रया गेलेल्या अवस्थेत
दुभाजक पडून राहिला. रस्त्यात असलेल्या दुभाजकामध्ये बऱ्याच ठिकाणी केवळ मातीच भरलेली
आहे. तर, दुभाजकावर काँग्रेस गवत, बिलायत, धोतरा, रुई, बाभळीची झुडपे उगवली आहेत. यामुळे दुभाजकाची दुरवस्था अधिकच अधोरेखित होत आहे.
शिवजयंती आली, की दोन दिवस अगोदर दुभाजकांवर
वाढलेले गवत, रानटी झुडपे काढली जातात. परंतु, सुशोभीकरणाचे
नाव काही कोणी घेत नाही. हा
रस्ता बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो; त्यामुळे नगरपालिका काही लक्ष घालत
नाही. परंतु, यामुळे शहराची दुरवस्था पुढे येते, याचे भान नगरपालिकेला नाही.
(वार्ताहर)

Web Title: In the main road dividers, grasses, shrubs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.